परभणी : नांदेड रेल्वे विभागातील परभणी येथून प्रथमच सोयाबीन बियाण्याची रेल्वेने मालवाहतूक करण्यात आली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी बनवलेल्या बिजनेस डेव्हलपमेन्ट युनिट (बी.डी.यु.) ला यश आले आहे. नगरसोल येथून किसान रेल्वेने कांदा आणि द्राक्ष देशभरात पाठविण्यात येत आहेतच. त्यात सोमावारी परभणी रेल्वे स्टेशनवरून ४२-बी.सी.एन. वॅगन्स मधून २ हजार ६६१ टन सोयाबीन बियाणे गुजरात येथील गांधीधाम येथे पाठविण्यात आले आहेत.
परदेशातही सोयाबीन पाठविण्याची संधी
मराठवाड्यात सोयाबीनचे पीक खूप मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या सोयाबीनची वाहतूक आतापर्यंत ट्रक तथा टेम्पोने जवळपासच्या शहरांत तसेच विदर्भात केली जात होती. परभणी येथून गांधीधाम, गुजरात येथे सोयाबीन गेल्यामुळे येथील शेतकऱ्यांना त्यांचा माल विविध राज्यांत तसेच परदेशातही पाठविण्याची संधी यामुळे निर्माण झाली आहे.
रेल्वेचा मालवाहतूक वाढविण्यावर जोर
भारतीय रेल्वेने आता मालवाहतूक वाढविण्यावर अधिक जोर दिला आहे. माल रेल्वे डब्यांमध्ये चढविण्यापासून तो माल उतरविण्यापर्यंत पाठपुरावा केला जात आहे. ज्यामुळे मालवाहतूक अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे होत आहे. त्यातच नव्यानेच गठीत केलेल्या बिजनेस डेव्हलपमेन्ट युनिटचे अधिकारी विविध क्षेत्रातील व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांच्या भेटी घेऊन त्यांना रेल्वेने माल वाहतूक केल्यास त्यांचा माल वेगाने, सुरक्षित आणि कमी खर्चात कसा पोहोचविला जाईल, याचे महत्व पटवून देत आहेत.
महाव्यवस्थापकांचे व्यापाऱ्यांना आवाहन
महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी नांदेड विभागातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मालवाहतूक वाढविण्याकरिता करत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक यांना आवाहन केले आहे की, त्यांनी रेल्वेतर्फे दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती, संधी आणि सुविधा वापरून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा. तसेच नांदेड विभागातून पर्यायाने दक्षिण मध्य रेल्वेमध्ये माल वाहतूक वाढवण्यात हातभार लावावा असे आवाहन केले आहे.