परभणी - मुंबईतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून त्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि अंगणातील कुंड्यांची नासधूस केली. जिल्ह्यातील काही तरुणांनी या घटनेचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन करून निषेध व्यक्त केला. तसेच या प्रकरणी विविध संघटना व पक्षांच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलकांनी दोषींना तात्काळ पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात आज बुधवारी शहरातील नागवंशी प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी भन्ते मुदितानंद यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान आमची अस्मिता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सर्वत्र बहुजन समाज रोष व्यक्त करत आहे. या हल्ल्याचा मुंडन आंदोलन करून निषेध करत असल्याचे नागवंशी प्रतिष्ठानचे सचिन पाचपुंजे यांनी सांगितले. यावेळी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध नोंदवला.
या हल्ल्याचा निषेध शहरातील प्रभाग क्रमांक 12 चे काँग्रेस नगरसेवक नागेश सोनपसारे यांनी कार्यकर्त्यांसह नोंदवला. त्यांनी जिल्हाधकारी दीपक मुगळीकर यांना निवेदन देऊन गुन्हेगारांना तात्काळ पकडून अटक करण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्या सोबत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. गुन्हेगारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.