परभणी - जिल्ह्यात बहुतांश भागात गेल्या 24 तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच पालम तालुक्यात मंगळवारी (दि. 8 सप्टेंबर) पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी बसरत आहेत. ज्यामुळे पुयणी, पेठ पिंपळगाव, बनवस आदी गावात पूराचे पाणी शिरले, तर तालुक्यातील लेंडी आणि गळाटी या नद्यांसह ओढ्यांना पूर आल्याने 12 गावांचा पालमशी संपर्क तुटला आहे. या प्रमाणेच सेलू तालुक्यातील कुपटा येथे पुराच्या पाण्यात ऐनपोळ्याच्या मुहूर्तावर बैलजोडी वाहून गेली आहे. एकूणच संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यात 24 तासापासून पावसाची संततधार
परभणी जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांत पावसाने कहर केला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला सोयाबीन व कापूस या नगदी पिकाचा घास अतिवृष्टीने हिसकावला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 6 सप्टेंबरला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस अजूनही थांबलेला नाही. सुमारे 24 तासापासून परभणी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे.
'लेंडी-गळाटी'ला पूर; 12 गावांचा संपर्क तुटला
पालम तालुक्यातील लेंडी नदीमुळे फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी, पुयणी, वनभूजवाडी, आडगाव या गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच शिरपूर ते सायळा या रस्त्यावर गळाटी नदीच्या पात्रात नवीन बांधलेल्या पुलावरून 10 फुट पाणी वाहत असल्यामुळे सायळा, धनेवाडी, खुर्लेवाडी, रावराजूर या गावांचा संपर्क तुटला आहे.
पुयणी, पेठपिंपळगाव, बनवस गावात पाणी शिरले
सततच्या पावसामुळे पालम तालुक्यातील पुयणी गावात लेंडी नदीच्या पूराचे पाणी घुसले आहे. ज्यामुळे मारोती मंदीर, जुनी शाळा, रस्त्या काठच्या घरांमध्ये पाणी शिरले. याप्रमाणेच गावा जवळून वाहणाऱ्या नाल्यांचे पाणी पेठपिंपळगाव आणि बनवस या गावांमध्येही शिरले आहे. त्यामुळे गावातील शाळा, मंदिरे आणि सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने हाहाकार उडाला आहे. तसेच सध्या पाणी पातळी वाढते आहे. ज्यामुळे पालमकडे जाणाऱ्या संपूर्ण रस्त्यावर जागोजागी 4 फुट पाणी साचले आहे. त्यामुळे ग्रामस्थ गावात अडकून पडले आहेत.
बैलजोडी पूराच्या पाण्यात वाहून गेली
मुसळधार पावसामुळे सेलू तालुक्यातील कुपटा गावात रस्ता ओलांडणारी एक बैलजोडी पूराच्या पाण्यात वाहून गेली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. जिल्ह्यात सर्वत्र होत असलेल्या या पावसामुळे नदी आणि नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. या पुरामध्ये वेगवेगळ्या दुर्घटना घडत असल्या समोर येत आहेत. यात बैलजोडी वाहून गेल्याचा प्रकार ऐन बैलपोळ्याच्या मुहूर्तावर समोर आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - परभणीतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली?, उद्योगमंत्री देसाईंचे खासदार जाधवांना आश्वासन