परभणी - पार्किंगच्या वादातून पाथरीत एका व्यक्तीने चक्क गोळीबार केल्याने खळबळ उडाली. घटनास्थळावरून फरार झालेल्या या आरोपीला पोलिसांनी 24 तासांत अंबाजोगाई येथून अटक केली आहे.
पाथरी येथील अजीज मोहल्ल्यात गाडी लावण्याच्या कारणावरुन मोहम्मद बिन सईद बिन किलेब, (रा.अजीज मोहल्ला, पाथरी) याने स्वतःजवळील रिव्हॉल्व्हरमधुन सालन बिन सालेबीन हवेल यास जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. गोळी कानापासून गेल्याने सालनचा जीव वाचला. मात्र, या प्रकारामुळे पाथरीत एकच गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी आरोपी शिविगाळ करुन सालनला धमकावत घटनास्थळावरुन फरार झाला होता. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कृष्णकान्त उपाध्याय, अपर पोलीस अधीक्षक रागसुधा आर, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. घटनेची संपूर्ण माहिती घेवून पोलीस अधीक्षक उपाध्याय यांनी त्वरित शोध पथके तयार करण्याच्या सुचना देऊन त्यांना रवाना केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद विपट, पोलीस कर्मचारी सग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, जमीरोद्दिन फारोकी, शंकर गायकवाड, परमेश्वर शिंदे, दिलावर पठाण, शेख अझहर व चालक पोना अरुण कांबळे, संजय घुगे यांनी घटना घडल्यापासुन सतत आरोपीची गोपनीय माहिती काढून त्याच्या ठावठिकाणाची माहिती घेतली. त्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला अंबाजोगाई शहरातून पिस्तुल व एक जिवंत काडतूस आणि रिकाम्या राऊंडसह गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. त्याला पाथरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.