परभणी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मंगलकार्यालय बंद ठेवण्याचे आदेश बजावले आहेत. परंतु, या आदेशाला झुगारून गंगाखेडच्या दोन मंगलकार्यालयात आज(शुक्रवार) दुपारी दोन विवाहसोहळे थाटामाटात पार पडले. याबद्दल गंगाखेडच्या पोलीस ठाण्यात दोन्ही मंगलकार्यालयांच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी शासकीय स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये गर्दीचे ठिकाण प्रामुख्याने बंद करण्यात आली आहेत. ज्यामध्ये मॉल, मंगलकार्यालय, आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने बजावले आहेत. त्यामुळे अनेक मंगलकार्यालयातील लग्नाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, तर अनेकांनी साध्या पद्धतीने आपल्या घरीच लग्नकार्य ऐकून घेतले. असे असतानादेखील जिल्ह्यातील गंगाखेड येथील समर्थ मंगलकार्यालयात गुरुवारी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी विवाहसोहळा पार पडला. ज्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले. विशेष म्हणजे या मंगलकार्यालयाचे मालक सदानंद गोविंदराव जोशी यांना यासंदर्भात आधीच सूचना दिली होती. तरी, देखील हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आल्याने त्यांच्यावर आज गंगाखेडच्या पोलीस ठाण्यात कलम 188 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत नगरपालिकेचे स्वच्छता विभागप्रमुख वसंत वाडकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रमाणेच गंगाखेड तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी शंकर रामराव राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार परळी रोडवरील ओम साई मंगलकार्यालयाच्या मालकावर गुन्हा दाखल झाला आहे. या कार्यालयातदेखील दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी एक विवाहसोहळा पार पडला. त्यामुळे या दोनही कार्यालयांच्या मालकांवर गुन्हे दाखल झाले असून पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.