परभणी - जिंतूरमधील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर आज (रविवारी) भाजपाचे नेते रामप्रसाद बोर्डीकर व राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे या दोघांसह समर्थकांमध्ये वाद झाला. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक केली. ज्यामध्ये कार्यकर्त्यांसह काही पोलीस देखील जखमी झाले. यामुळे पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर लाठीमार करून त्यांना पिटाळून लावले. दरम्यान, या प्रकारामुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि राखीव दलाची तुकडी देखील बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाली आहे.
मतदाना दरम्यान झाला प्रकार
जिंतूर औद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज रविवारी सकाळपासून जि.प. शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान सुरू होते. यासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व माजी आमदार विजय भांबळे यांचे दोन्ही गट मतदान केंद्राच्या बाहेर तळ ठोकून होते. मात्र, यावेळी मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत का आलात ? म्हणून बोर्डीकर व भांबळे यांच्यात वाद सुरू झाला. बाचाबाची झाली, प्रकरण हमरीतुमरीवर गेले. शिवीगाळ करण्यापाठोपाठ हे दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्याचा परिणाम समर्थकही एकमेकांमध्ये भिडले. सुमारे 20 मिनिटे या दोन्ही गटात मोठी धुमश्चक्री झाली. दोन्ही बाजूनी तुफान दगडफेक झाली. ज्यामध्ये कार्यकर्त्यांसह काही पोलीस सुद्धा जखमी झाले. यानंतर जिंतूर पोलीसांनी तातडीने जास्तीची कुमक बोलावून लाठीमार करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले.
जिंतूरमध्ये तणाव
या घटनेनंतर पोलीसांनी तातडीने ताफा मागून लाठीमार करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. मात्र या प्रकाराने जिंतूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. बोर्डीकर हे शासकीय विश्रामगृहात तर भांबळे हे नगरपालिका कार्यालयात ठाण मांडून होते. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच बोरी, चारठाणा व अन्य ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मोठा ताफा जिंतूरात दाखल झाला आहे. अधिकारी पुढे काय कारवाई करतील, या याकडे लक्ष लागले आहे.
'भांबळेंकडून राडीचा डाव'
जिंतूर आद्यौगिक वसाहत संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी आमदार विजय भांबळे व त्यांच्या कुटुंबियांना कुठलाही मतदानाचा अधिकार नाही. मात्र असे असताना या ठिकाणी ते ठाण मांडून होते. या निवडणुकीत भाजपाचा एकतर्फी विजय होणार असल्याचे दिसून आल्याने भांबळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रडीचा डाव खेळला, असा आरोप आमदार मेघना बोर्डीकर यांनी केला. तसेच या प्रकरणात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असून, त्यांच्यावरील कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी देखील आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली.
'बोर्डीकरांकडून मतदारांवर दबाव'
या निवडणुकीत मतदारांनी आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी माजी आमदार बोर्डीकर रामप्रसाद बोर्डीकर व त्यांची कन्या आमदार मेघना साकोरे यांच्याकडून दबाव टाकण्यात येत होता. आम्ही काही साधू शकत नाही त्यामुळे आम्हालाही त्यांना उत्तर द्यावे लागेल, असे माजी आमदार विजय भांबळे म्हणाले. तसेच मतदारांना त्यांचा हक्क बजावण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी होतो. या प्रकारात पोलिसांनी कुठलाही दुजाभाव केला नाही. अत्यंत पारदर्शकपणे प्रकरण हाताळले, असे देखील माजी आमदार विजय भांबळे माध्यमांशी बोलताना सांगितले.