परभणी - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे.शनिवारी दिवसभरात तब्बल 54 नवे रुग्ण आढळून आले आहेत. परभणीतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल 676 वर जाऊन पोहोचली आहे. कोरोनामुळे 3 रुग्णांचा मृत्यू देखील झाला असून मृत्यू झालेल्यांची संख्या 33 झाली आहे. 2 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
जून महिन्याच्या शेवटपर्यंत समाधानकारक परिस्थिती असलेल्या परभणी जिल्ह्यात गेल्या महिनाभराच्या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड झपाट्याने वाढत आहे. 100 रुग्ण संख्या असलेल्या परभणी जिल्ह्यात जुलै महिन्यात ही संख्या 600 च्या वर जाऊन पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी त्यात 54 रुग्णांची भर पडली. ज्यामुळे परभणीकरांची चिंता आता वाढू लागली आहे.
कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या आता मंदावली आहे. शनिवारी दिवसभरात केवळ दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. परभणी तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील 40 वर्षीय पुरुष आणि पूर्णा शहरातील आनंद नगरातील 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज दिवसभरात करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन तपासणीत 34 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. या शिवाय आरटीपीसीआर तपासणीत 20 रुग्ण आढळून आले आहेत. परभणी शहरातील युसुफ कॉलनीतील 45 वर्षीय पुरुष, डॉक्टर लेन भागातील 64 वर्षीय महिला, काद्राबाद प्लॉटवरील 72 वर्षीय पुरुष, गुलशनाबाग मधील 42 वर्षीय पुरुष, माळीवेस भागातील 36 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, नवा मोंढा भागातील 70 वर्षीय पुरुष, साखला प्लॉट भागातील 28 वर्षीय तरूण, गणेश नगरातील 32 वर्षीय तरूण, मुमताज नगरातील 62 वर्षीय महिला, दर्गा रस्त्यावरील 55 वर्षीय महिला, माळी गल्लीतील खासगी बेकरीत काम करणारी 23 वर्षीय तरूणी, कौसर कॉलनीतील 38 वर्षीय पुरुष बाधित आढळून आले आहेत. तसेच मानवत शहरातील गुलजारवाडीतील 41 वर्षीय पुरुष, कोक्कर कॉलनीतील 72 वर्षीय व 60 वर्षीय महिला, मानोलीतील 68 वर्षीय महिला, गंगाखेड शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील 70 वर्षीय पुरुष, तालुक्यातील इसाद येथील 56 वर्षीय पुरुष व पाथरीतील 40 वर्षीय पुरुष अशा 8 महिला आणि 12 पुरुषांसह एकूण 20 कोरोनाबाधितांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण 676 रुग्ण कोरोनाबाधित असून, त्यापैकी 392 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 33 जणांचा मृत्यू झाला असून 251 रुग्ण जिल्हा रुग्णालयातील कोरोना संक्रमित कक्षात उपचार घेत आहेत. शनिवारी दिवसभरात नव्याने 43 संभाव्य रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण 4 हजार 658 संशयित रुग्ण दाखल झाले असून, संसर्गजन्य कक्षात 278, विलगीकरण केलेले 674 व विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले 3 हजार 706 एवढे रुग्ण आहेत. एकूण 5 हजार 67 संशयितांचे स्वॅब घेतले गेले असून, त्यातील 4 हजार 169 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर 676 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. या शिवाय 128 स्वॅब अनिर्णायक असून 52 स्वॅब तपासणीस आयोग्य ठरले आहेत. 42 स्वॅबच्या अहवालाची अजूनही प्रतीक्षा आहे.