परभणी - दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ गुरुवारी (दि. 10 डिसें.) परभणीत उद्योजक अंबानींच्या 'जिओ' या मोबाईल सीम कार्डची होळी करण्यात आली. कारण भाजपच्या मोदी सरकारचा प्राण उद्योजक आदानी आणि अंबानींच्या उद्योगात गुंतला असून, ते शेतकऱ्यांचा घाट करत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आहे.
परभणीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानावर झाले आंदोलन
दिल्ली येथे मागील अनेक दिवसांपासून शेतकरी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांकडून विविध प्रकारचे निदर्शने करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत उद्योजक अंबानी आणि अदानी यांच्यासाठी सरकारने शेतकरी कायदे बनवण्याचा आरोप करत शेतकरी त्यांचा निषेध व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांनी या दोन उद्योजकांच्या उत्पादनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर परभणीत देखील दिल्ली येथील किसान आंदोलनाला आणि त्या आंदोलनकर्त्यांनी घातलेल्या बहिष्काराला समर्थन देण्यासाठी उद्योजक अंबानींच्या जिओ सिम कार्डची होळी करण्यात आली. हे आंदोलन परभणीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानावर करण्यात आले. यावेळी सिम कार्डची होळी करत असताना केंद्र सरकार विरोधात तसेच उद्योजक अदानी आणि अंबानी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
उद्योजकांना धडा शिकविण्यासाठी बहिष्कार घाला
या संदर्भात बोलताना संघर्ष समितीचे कॉ. राजन क्षीरसागर म्हणाले, शेतकऱ्यांनी अंबानी व अदानीच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार घालावा. हे दोन उद्योजक शेतकऱ्यांचा घात करत असून, त्यांना धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले पाहिजे, असेही ते म्हणाले. या आंदोलनात संघर्ष समितीचे माणिक कदम यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
हेही वाचा - परभणीत कापूस पणन महासंघाच्या विरोधात जिनिंगधारकांचे आमरण उपोषण
हेही वाचा - परभणीत ‘महाबीज’च्या कर्मचाऱ्यांचा संप, विभागीय कार्यालयासमोर निदर्शने