परभणी - सेलू तालुक्यातील पीसी सांवगी येथील शेतकऱ्याने आज सकाळच्या सुमारास नापिकी आणि दुष्काळाला कंटाळून शेतातील विहिरीच्या मोटर गार्डला दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुदाम किशनराव ताठे (वय ४५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीला कंटाळले होते. मागील २ वर्षांपासून त्यांना खरीप आणि रब्बी पिकांचे उत्पन्न झाले नव्हते. शिवाय बँकेचे ४ लाख रुपयांचे कर्जही डोक्यावर असल्यामुळे ते नेहमी चिंताग्रस्त असायचे. याच विवंचनेत त्यांनी आज सकाळी विहिरीतील मोटर गार्डला दोरी बांधून गळफास घेतला.
घटनास्थळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. आर. गिते, पोलीस कॉन्स्टेबल बळीराम ईगारे यांनी भेट देऊन पंचनामा केला. सेलू येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह ताठे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुल, असा परिवार आहे.