परभणी - 'कोरोना' च्या महामारीमुळे लॉकडाऊनची परिस्थिती ओढावली आणि संपूर्ण जग एका जागी थांबले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणीतही मोठी वाढ झाली आहे. पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाणच्या एका शेतकऱ्याने मोठ्या आशेने केळीची बाग पिकवली होती. मात्र, आता बाजारात केळीला केवळ 2 रुपयांचा भाव मिळत असल्याने ती केळी विकण्यासदेखील परवडत नाही. परिणामी या शेतकऱ्याने संपूर्ण बागच उद्ध्वस्त करून टाकली आहे. ज्यामुळे या शेतकऱ्याला सुमारे दोन लाख रुपयांचा फटका बसला आहे.
सध्याच्या परिस्थितीचा समाजातील प्रत्येक घटकाला फटका बसला आहे. रोजंदारीवर काम करणारे मजूर उपासमारीने हैराण झाले आहेत. समाजातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुढेदेखील अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत, भरल्या तरी काही काळापुरत्या चालू राहतात. परिणामी विक्रीअभावी शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात शिल्लक राहात आहे.
शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून बाजार नसल्याने काढणीस आलेली पिके नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशीच वेळ पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथील शेतकरी किसन घाडगे यांच्यावरदेखील ओढवली आहे. त्यांनी आपल्या शेतात केळीची 1 हजार 800 झाडे लावली होती. पण बाजार बंद असल्याने केळीची विक्री होत नाही. त्यामुळे, किसन घाडगे यांनी आपल्या शेतातील सर्व झाडे उपटून टाकली आहेत. त्यांना केळी लागवडीसाठी 75 हजार रुपयांचा खर्च आला होता. त्यातून त्यांना 2 लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात केळी काढून बाजारात नेण्यासाठी येणाऱ्या वाहतुकीचा खर्चसुद्धा निघत नाही.
बाजारात केळीला दोन रुपयांचा भाव आहे. प्रत्यक्षात वाहतुकीवर त्याहून जास्त खर्च होत आहे. ज्यामुळे किसन घाडगे यांनी स्वत:च बाग उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला. यामुळे, त्यांना सुमारे दोन लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे. सध्याच्या परिस्थितीत असे अनेक शेतकरी असून त्यांच्यावर मालाला भाव मिळत नसल्याने पिकच नष्ट करण्याची वेळ आली आहे.