परभणी - जिथे प्यायला पाणी नाही, तेथे पिकांसाठी कुठून आणणार? अशी अवस्था पाथरी तालुक्यातील खेर्डा येथील शेतकऱ्यांची झाली आहे. येथील एका शेतकऱ्याने काढणीला आलेली केळीची बाग पाणी नसल्यामुळे उध्वस्त केली आहे. पाणी नसल्याने ही बाग करपून जात होती. त्यामुळे परिणामी शेतकऱ्याने झाडे तोडण्याचा निर्णय घेतला.
अनिता आत्माराम सिताफळे (खेर्डा, तालुका पाथरी) या महिला शेतकऱ्याची 1 हेक्टर शेती आहे. या शेतात त्यांनी गत वर्षी जुलै महिण्यात 3 हजार केळीची रोपे लावली होती. यासाठी त्यांनी दीड लाख रुपये खर्च केले. आता केळी काढणीच्या अवस्थेत असतान पाणी नसल्याने केळीची झाडे वाळून गेली. त्यामुळे हतबल झालेल्या सिताफळे यांनी झाडे तोडण्यास सुरूवात केली आहे.
अनिता सिताफळे यांच्याप्रमाणेच इतर अनेक शेतकऱ्यांच्याही केळी आणि इतर फळबागा पाण्याअभावी जळून गेल्या आहेत. त्यामुळे या पिकांची शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी येथील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
गोदाकाठी जलसंकट-
पाथरी हा तालुका गोदकाठी वसलेला असून तालुक्यातून जायकवाडीचा कालवा जातो. त्यामुळे गोदावरी तसेच जायकवाडीच्या पाण्यामुळे शेतातील पिके काही अंशी का होईना हिरवी होती. मात्र, मागील महिण्यापासून नदी, नाले एकापाठोपाठ एक पाणवठे आटल्यामुळे पिकेही वाळून गेली आहेत.