परभणी - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा पंचनामा करण्यासाठी आलेल्या महसूलच्या पथकाच्या प्रश्नांना वैतागून एका शेतकऱ्याने चक्क शेतात रचून ठेवलेली सोयाबीनची गंजीच पेटवून दिली. हा प्रकार जिंतूर तालुक्यातील चौधरणी येथे घडला. यावरून शेतकरी प्रशासनाच्या कागदपत्रांच्या फेऱ्याला किती त्रासले आहेत, हे स्पष्ट होते
जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस स्टेशनपासून जवळ असलेल्या चौधरणी या गावात महसूलचे पथक पंचनामा करण्यासाठी गेले होते. या ठिकाणचे शेतकरी शेख हमीद अब्दुल रजाक हे त्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे कापून ठेवलेल्या सोयाबीनचे नुकसान झाल्याने प्रचंड त्रासलेले होते. 7 एकर शेती असलेले शेख हमीद यांना पाऊस चांगला झाल्याने सोयाबीनचे उत्पन्न भरघोस मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, परतीच्या अवकाळी पावसाने घात केला.

त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने शेतातून पथक जाताच, संध्याकाळी उशिरा रागाच्या भरात सोयाबीनच्या गंजीला आग लावून दिली. या गंजीत साधारण 30 ते 40 पोते होईल इतके सोयाबीन असल्याचे सांगण्यात येते. मात्र, ते आता जळून खाक झाल्याने या शेतकऱ्याच्या हाताला काहीच लागणार नसल्याचे दिसून येते. या शेतकऱ्याला आता प्रशासनाने मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.