परभणी - शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे, यासाठी सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिबंधीत बियाणाची लागवड करुन कायदेभंगाचे आनोखे आंदोलन केले. सध्या पाऊस नसल्याने हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात प्रत्येक तालुक्यात हे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
सोनपेठ तालुक्यातील वाडी पिंपळगाव येथे गुरुवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी प्रतिबंधीत आरआरएफ बिटी कापसाचे बियाणे लावून कायदेभंग केला. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सुध्दा सहभागी झाल्या होत्या. सध्या पाऊस पडला नसल्याने हे प्रातिनिधिक आंदोलन करण्यात आले होते. पाऊस पडल्यावर गावोगावी शेतकरी आपल्या शेतात हे प्रतिबंधीत बियाणे लावून कायदेभंग करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू यांनी यावेळी सांगितले. या आंदोलनात रंजना जाधव, कमल जाधव, सुदामती जाधव, पद्ममीनबाई धानोरकर, सिंधुबाई जाधव, शिलाबाई जाधव, अमरदिप नागुरे, माधव जाधव, सोमनाथ नागुरे, अशोक चांदवडे, माणिक तेलभरे, देविदास भुजबळ, धुराजी जाधव, सुर्यकांत कदम, बळीराम जाधव, सिध्देश्वर जाधव आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, हरीयाणातील शेतकऱ्यांच्या शेतात जीएम वांगे सापडल्यानंतर देशभर शेतकऱ्यांना जीएम तंत्रज्ञान उपलब्ध करावे, या मागणीसाठी शेतकरी जोरदार आंदोलन करत आहेत. शिवाय आकोला जिल्ह्यात प्रतिबंधीत आरआर बिटीची जाहीर लागवड करण्याचे आंदोलन केल्यानंतर राज्यभर शेतकरी या प्रतिबंधित बियाण्याची लागवड करुन कायदेभंग आंदोलन करत आहेत.