परभणी - तालुक्यातील बोरवंड येथील शेतकरी नरहरी तुकाराम यादव 2017 पासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. वारंवार चकरा मारूनही न्याय मिळत नसल्याने वैतागून त्यांनी आज परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात असलेल्या एका झाडावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. यावेळी त्यांनी झाडावर गळफास लावून घेण्याचादेखील प्रयत्न केला. बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांनी समजूत घातल्यानंतर ते खाली उतरले.
हेही वाचा - सांगलीत ऊस दर आंदोलनाची ठिणगी, एफआरपीच्या मागणीवरुन स्वाभिमानी आक्रमक
नरहरी यांची बोरवंड येथे एक हेक्टर जमीन आहे. 2017च्या दुष्काळात कुठलेच पीक त्यांच्या हाती आले नाही. अशा परिस्थितीत त्यांना पीक विम्याचा आधार होता. परंतु तो अद्यापही मिळालेला नाही. वारंवार संबंधितांकडे मागणी करूनही पीक विमा मिळत नसल्याने ते त्रासून गेले होते. त्यातच नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीकही गेले. त्यामुळे उद्विग्न होऊन त्यांनी हे पाऊल उचलेल. याप्रकरणाची कोतवाली पोलिसांनी नोंद घेतली आहे. या आंदोलनामुळे काही काळ बाजार समिती परिसरात खळबळ उडाली होती.