परभणी - जिल्ह्यात बुधवारी नव्या 8 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. या नवीन रुग्णांसह परभणी जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 162वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान 5 जणांना कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षातून सुट्टी देण्यात आली, तर सद्यपरिस्थितीत 51 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
परभणी जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सहा दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र बुधवारी एक दिवस आधीच शिथिलता देण्यात आल्याने सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत परभणी जिल्ह्यातील बाजार भरले होते. दरम्यान गेल्या 24 तासात परभणी जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये परभणी शहरातील कडबी मंडई येथील 28 वर्षे पुरुष तर तालुक्यातील करडगाव येथे 45 व 35 वर्षाचे तर शहापूर येथील 35 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. याशिवाय सेलू शहरातील शास्त्रीनगर 60 ववर्षीय पुरुष रुग्ण आढळून आला आहे. या शिवाय गंगाखेड येथे पूजा मंगल कार्यालय व वकील कॉलनी या परिसरांमध्ये 30 वर्षीय महिला आणि 35 व 40 वर्षीय दोन पुरुष रुग्ण आढळून आले आहेत.
या रुग्णांमध्ये यापूर्वी आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील संशयित रुग्णांचा समावेश आहे. गंगाखेडच्या पूजा मंगल कार्यालय परिसरात आणि सेलू येथे यापूर्वी आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील बुधवारी आढळून आलेले रुग्ण असल्याची माहिती आहे. याच दरम्यान बुधवारी दिवसभरात कोरोना मुक्त झालेल्या 5 रुग्णांना देखील जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षातून सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील झरी येथील 3 रुग्णांचा तर पाथरा आणि जांब येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, बुधवारी नव्याने 77 रुग्ण संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्या सर्व रुग्णांचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे. तर जिल्हात आतापर्यंत 2 हजार 968 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 2 हजार 792 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर बुधवारी तब्बल 92 संशयीत रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. तसेच 95 अहवाल हे अनिर्णीत असल्याचे तर 47 अहवालांची तपासणी करण्याची आवश्यकता नाही, असा अहवाल नांदेडच्या गुरुगोविंदसिंह वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने दिलेला आहे.
विशेष म्हणजे परभणीच्या विलगीकरण कक्षात आतापर्यंत 2 हजार 633 जणांनी विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे. ज्यामध्ये 74 रुग्ण हे परदेशातून आलेले तर त्यांच्या संपर्कातील 6 जणांचा समावेश होता. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण 162 रुग्णांपैकी 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर आतार्यंत 107 जणांना कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. ज्यामुळे उर्वरीत 51 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या संक्रमित कक्षात उपचार सुरू आहेत. याशिवाय बाहेर जिल्ह्यात अहवाल तपासणीसाठी देऊन परभणीत आलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांवर देखील या ठिकाणी उपचार सुरू आहेत. ज्यामुळे कोरोना कक्षात एकूण 53 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.