परभणी - चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येणाऱ्या परभणी जिल्ह्यात मंगळवारी मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील परभणी, सोनपेठ, पाथरी, सेलू आणि जिंतूर या 5 तालुक्यांमध्ये केवळ 8 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. या तुलनेत कोरोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परभणी व पूर्णा तालुक्यातील तब्बल 17 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांनी सुट्टी देण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात मंगळवारपर्यंत 290 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 138 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे तर 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परभणी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षात सद्यपरिस्थितीत 144 रुग्ण उपचार घेत आहेत.जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तब्बल 38 संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.
दरम्यान,मंगळवारी 8 रुग्ण आढळून आले आहेत. 8 रुग्णांमध्ये परभणी शहरातील दर्गा रोडवरील 62 वर्षीय तर मुमताज नगरातील 59 वर्षीय पुरुषाचा आणि जुना पेडगाव रोडवरील 46 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सोनपेठ तालुक्यातील भिसेगाव येथील 35 वर्षीय महिला तर पाथरी तालुक्यातील कानसुर येथील 22 वर्षीय आणि सेलू तालुक्यातील वालुरच्या 28 व 25 वर्षीय पुरुष देखील कोरोनाबाधित आढळून आला आहे. याशिवाय जिंतूर तालुक्यातील बोरीच्या पेठ गल्ली भागात राहणारा 25 वर्षीय तरुणाचा सुद्धा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बोरीत पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
परभणी मध्ये आढळलेले रुग्ण शहरात यापूर्वी जुना पेडगाव रोड, मुमताज नगर व दर्गा रोड येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कातील आहेत. 3 रुग्णांच्या संपर्कातील इतर लोकांचा आरोग्य प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे.
सोनपेठ तालुक्यातील भिसेगाव गाव आणि पाथरी तालुक्यातील कानसुर येथील रुग्ण मात्र नव्याने आढळून आले आहेत. सेलू तालुक्यातील वालुर येथे यापूर्वी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला आहे. हा रुग्ण देखील त्याच रुग्णाच्या संबंधातील असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे.
बोरी येथे सुद्धा मागच्या महिन्यात काही कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यानंतर बोरी गावात एकही कोरोनाबाधित नव्हता; मात्र आजच्या अहवालात कोरोना रुग्ण आढळून आल्याने गावकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वरील सर्व गावे आणि ठिकाणे निर्जंतुकीकरण करण्यात आले.यानंतर पोलिसांकडून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. या सर्व भागांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी काढले आहेत.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात आत्तापर्यंत 3 हजार 480 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 3 हजार 240 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 290 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये गंगाखेड येथे अँटिजेन रॅपिड टेस्टच्या माध्यमातून 41 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. सद्यपरिस्थितीत 26 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असून, 110 जणांचे अहवाल अनिर्णित आहेत. तसेच 48 रुग्णांच्या अहवालांची तपासणी आवश्यक नाही, असा देखील निर्वाळा प्रयोगशाळेने दिलेला आहे.