परभणी - जगावर आलेले 'कोरोना'चे संकट दूर करण्याची अल्लाहकडे प्रार्थना करत मुस्लीम बांधवांनी यंदा घरात राहूनच रमजान ईद साजरी केली. कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून सार्वजनिकरित्या होणारी प्रार्थना टाळुन मुस्लीम बांधवांनी आपापल्या घरातच नमाजचे पठाण केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील लॉकडाऊन आहे. याच दरम्यान मुस्लीम बांधवांच्या 'ईद' हा सण साजरा होत आहे. त्यामुळे घरातच नमाज अदा करून ईद साजरी करण्यात आली.
ईदगाह मैदानावर होत असते नमाज -
दरवर्षी रमजान ईद निमित्त मुस्लीम बांधवांकडून एकत्रित येऊन परभणीच्या जिंतुर रोडवरील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होत असते. यासाठी मैदानाची साफसफाई करून पूर्वतयारी केल्या जाते. विविध मशिदींचे मौलवी याठिकाणी उपस्थित असतात. या ठिकाणी हजारो मुस्लीम बांधव नमाज अदा करतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे चित्र दिसून आले नाही. मैदानावर पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र, नमाज पठण करण्यासाठी मुस्लीम बांधव आलेच नाही. प्रत्येक मुस्लीम बांधवाने आपल्या घरातच ईदची नमाज पठाण करून हा सण साजरा केला.
कोरोना संकट दूर करण्याची प्रार्थना -
'रमजान ईद' संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जोपर्यंत चंद्रदर्शन होत नाही. तोपर्यंत दररोज एक महिना रोजे पाळले जातात आणि शेवटच्या दिवशी रोजे सोडतात. वाईट संगतीपासून दूर राहून, आत्मशुद्धीकरणासाठी मुस्लीम बांधव या महिन्यात रोजे पाळतात. त्यामुळेच प्रत्येकाला तहान आणि भुकेचीही किंमत समजते. ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव मशिदीमध्ये जावून नमाज अदा करून अल्लाहची प्रार्थना करतात. या दिवशी प्रत्येक मुस्लीम बांधवांच्या घरी खाद्यपदार्थांची मेजवानी असते. शेवया, दूध आणि काजू-बादाम आदी ड्राय फ्रुट्स वापरून बनवलेला शीरखुरमा या पदार्थाला या दिवशी विशेष महत्त्व असते. सर्वच मुस्लीम बांधव आपापल्या मित्रपरिवाराला ईद दिवशी दावत सुद्धा देतात. मात्र कोरोनामुळे यावर्षी सलग दुसऱ्यांदा ते ईद साजरी करू शकत नाहीत. त्यामुळे मुस्लीम बांधवांनी या कोरोनाच्या स्थितीत समाजातील गोरगरीब लोकांना विविध मार्गांतून सेवा देत यंदाची ईद साजरी केली. विशेष म्हणजे या वर्षी मुस्लीम बांधवांनी ईदची नमाज पठण करत असताना कोरोनाचे संकट दूर करण्याची अल्लाहकडे प्रार्थना केल्याची माहिती परभणीच्या मुल्ला मशिदीचे मौलवी मौलाना झहीर अब्बास खासमी यांनी दिली.
'कोरोना'चे सर्व नियम पाळण्याचे केले आवाहन -
कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन देखील मौलवी झहीर अब्बास यांनी केले. येणाऱ्या काळात देखील तोंडाला मास्क बांधणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्स पाळणे जरुरी असल्याचे ते म्हणाले. तसेच प्रत्येक घरात अबाल-वृद्ध तसेच तरुणांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घरातच नमाजचे पठाण आवाहन त्यांनी केले. कोरोनाच्या संसर्गामुळे सार्वजनिकरित्या भेटण्यास मुस्लीम बांधवांनी टाळले.