परभणी - विद्यार्थी जीवनातील कौतुकाची थाप पुढील प्रवासासाठी प्रेरणादायी ठरते. या कौतुकाच्या थापेवरच विद्यार्थी त्याच्या अंतिम ध्येयाला गाठू शकतो. मानसशास्त्रामध्ये कौतुकाची थाप ही औषधोपचारापेक्षाही जास्त लाभकारक असल्याचा सिध्दांत आहे, असे मत डॉ. समप्रिया पाटील यांनी व्यक्त केले.
पिंगळी येथील गोकुळनाथ विद्यालयाचा विद्यार्थी किरण मात्रे याने नुकतेच गुजरातमधील नाडियाडा येथे संपन्न झालेल्या क्रॉसकंट्री स्पर्धेत देशात प्रथम येण्याचा मान मिळवला. त्याबद्दल त्याचा शाळेच्यावतीने गौरव सोहळा संपन्न झाला. यात बोलताना डॉ. समप्रिया पाटील म्हणाल्या, की किरण मात्रे याने खूप मोठे यश संपादन केले आहे. मी स्वत:ही अॅथलेटीक्सशी संबंधित आहे. त्याने जो ६ किलोमीटर अंतराचा टप्पा १७ मिनिटात पार केला, तो अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा ठरला आहे. त्याने हाताश न होता आपले ध्येय साध्य केल्याचे त्या म्हणाल्या.
अध्यक्षीय समारोप करताना अंबादास गरुड म्हणाले, की शिवजंयती दिनी आपण किरण मात्रे याला शुभेच्छा देत आहोत. आपल्या शुभेच्छांबरोबरच त्याला आजच्या दिवशी शिवरायांचा आशिर्वादही मिळाला आहे. मात्रे त्याने मिळवलेल्या या यशामुळे संस्थेच्या इतिहासात आजचा सोन्याचा दिवस आहे. शाळेत भौतिक सुविधा नसतानाही मात्रे याने मिळवलेल्या यशाने सर्व जण आनंदीत आहेत. त्याने आपल्या पालकांचे, शाळेचे व जिल्ह्याचे नाव देशपातळीवर नेले आहे. संस्थेच्यावतीने आज मात्रे याला २५ हजारांचा धनादेश देण्यात आला असला, तरी यापुढील त्याच्या यशासाठी संस्थेकडून ५१ हजार रुपये मदत देणार असल्याचे अंबादास गरुड यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबादास गरुड होते, तर विचारपीठावर मुख्याध्यापिका एस. ए. गरुड, चव्हाण, विठ्ठल गरुड, प्रभूअप्पा खाकरे, विजय गरुड, भानुदास डुबे, संभाजी लोखंडे, अंगद गरुड आदींची उपस्थिती होती. यावेळी संस्थेच्यावतीने मात्रे याला २५ हजार रुपयांचा धनादेश, क्रीडा साहित्य भेट म्हणून देण्यात आले. दरम्यान, किरण मात्रे याचे पिंगळी येथे आगमन होताच रेल्वे स्टेशनपासून ढोलताशाच्या गजरात त्याची गावातून मिरवणूक काढण्यात आली. पिंगळी गावासाठी भूषण ठरलेल्या मात्रे याचे गावात रस्त्यारस्त्यावर रांगोळ काढून औक्षण करून आणि पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले.