परभणी - सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा, कृष्णा आणि इतर नद्यांना पूर आल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. पाथरी शहरात रस्त्यावर भिक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या भिकाऱ्याने मनाची श्रीमंती दाखवत पै-पै जमा केलेली दोन हजारांची रक्कम पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून दिली. यानंतर परभणी येथील एका रिक्षाचालकाने देखील रात्रंदिवस मेहनत करून जमा केलेली पाच हजार रुपयांची रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून 'जन्मभूमी फाऊंडेशन'कडे सुपूर्द केली आहे.
परभणी येथे गेल्या तीस वर्षांपासून ऑटोरिक्षा चालवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे सुरेश बाबुराव भिसे हे आपल्या ऑटोरिक्षातून अपंगांना मोफत सेवा देतात. 'मी समाजाचे काही देणे लागतो, संकटात एकमेकांना सहकार्य करावं, संकटांनी खचून न जाता त्यांना नवी उमेद मिळावी, हाच या कार्यामागचा उद्देश असल्याचे सुरेश सांगतात. दुसऱ्याची मदत केल्याने कमी होत नाही तर जास्तच मिळते, तसेच यातून मिळणारे समाधान अत्यंत सुख:द असते, असे देखील ते यावेळी म्हणाले. पूरग्रस्तांच्या घर खर्चासाठी पाच हजार रुपयांची मदत त्यांनी या वेळी केली आहे. ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने जन्मभूमी फाऊंडेशनच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती अध्यक्ष सदाशिव थोरात यांनी दिली आहे. एका रिक्षा चालकाने पूरग्रस्तांना पाच हजार रुपयांची मदत केल्याने त्यांच्या या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पाथरीत पूरग्रस्त मदत समितीने 'पूरग्रस्तांसाठी' जमवला मोठा निधी
दरम्यान, पाथरी येथील स्व. नितिन कला व विज्ञान महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या वाढदिवसानिमित्त जमा करण्यात आलेला १७ हजार तीनशे रुपयांचा निधी प्राचार्य डॉ. राम फुन्ने आणि प्रा. डॉ. निर्वळ यांच्या हस्ते पूरग्रस्त मदत समितीकडे देण्यात आला. तर पत्रकार किरण घुंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त सय्यद गुलशेर खान यांनी चार हजार रुपये मदत समितीला दिले. तसेच पाथरीकरांनी मदत फेरीच्या माध्यमातून एक लाख आठ हजार रुपयांचा निधी जमा केला आहे. तर बकरी ईदच्या नमाजा वेळी केवळ अर्ध्या तासात एक लाख सहा हजार पाचशे रुपयांचा निधी जमा करण्यात आला होता. ही सर्व मदत पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती पूरग्रस्त मदत समितीने दिली आहे.