परभणी - कोरोना विषाणूच्या लढाईत अगदी पुढच्या रांगेत उभे राहून लढणाऱ्या परभणी जिल्ह्यातील आरोग्य आणि पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) व इंडियन होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष मंत्रालयाद्वारे सुचवलेले होमिओपॅथिक औषध 'आर्सेनिकम अल्बम-30' या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
कोरोना तसेच अन्य संसर्गजन्य आजारात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिकम अल्बम-30 हे होमिओपॅथिक औषध उपयोगी पडत असल्याने केंद्रीय आयुष मंत्रालयानेदेखील याचा वापर करण्याची सुचना केली आहे. सध्या आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून घरोघरी नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण सुरू आहे. या दोन घटकांची रोगप्रतिकारकशक्ति वाढावी म्हणून जिल्ह्यातील 1 हजार आशा वर्कर्सना हे औषध देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंकर देशमुख यांच्याकडे ते सुपूर्द केल्याची माहिती होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) चे अध्यक्ष डॉ.पवन चांडक यांनी दिली. यावेळी आयएचएमए सदस्य डॉ.आशा चांडक, चंद्रकांत अमिलकंठवार, राजेश्वर वासलवार, गोपाल मुरक्या, डॉ.शिरतुरवार, उदावंत यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉ. चांडक यांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथिक औषधी, त्याचे फायदे, पथ्य व मात्रा, औषधी कसे घ्यायचे, या विषयी मााहिती दिली. तसेच यापूर्वी जिल्ह्यातील जवळपास 2 हजार पोलीस कर्मचारी, 600 मनपा सफाई कामगार, 1 हजार 700 अंगणवाडीताई, 1 हजार 40 आशा वर्कर तसेच काही पत्रकार आणि वृत्तपत्र वाटप करणाऱ्या बांधवांना देखील या आर्सेनिक अल्बम-30 चे डोसेस देण्यात आले असल्याचेही डॉ. चांडक यांनी सांगितले.
कसे घ्यावे औषध
जागतिक आरोग्य संघटनेने या कोरोना संसर्गजन्य आजाराविषयी जी माहिती दिली आहे, त्यातील लक्षणावर आधारित सेंट्रल कॉउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथीच्या एक्स्पर्ट पॅनलने अभ्यास करून आर्सेनिक अल्बम-30 हे औषध रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सर्वच वयाच्या नागरिकांना देण्याचे सुचवले आहे. हे औषध लहान बाळ, लहान मुले, वयोवृद्ध, गरोदर स्त्रिया आणि कोणत्याही रोगाच्या रुग्णासाठी सुरक्षित असून, त्याचे कोणतेही दुष्पपरिणाम होत नाहीत. हे औषध देणे अत्यंत सुलभ असून त्याच्या कोणत्याही मात्रेमुळे इतर औषधोपचारामध्ये कोणताही व्यत्यय येत नाही.
प्रौढांना चार गोळी सकाळी उपाशीपोटी तीन दिवस, तर लहान मुलांना दोन गोळी उपाशीपोटी तीन दिवस द्यायची आहे. तसेच ज्या भागात विषाणूचा प्रादुर्भाव असेल त्या ठिकाणचे लोक पुन्हा 30 दिवसांनी आणखी या गोळ्या घेऊ शकतात.
काय आहे होमिओपॅथी, कसे काम करते हे औषध
होमिओपॅथी ही एक औषधोपचार असून तिची सुरुवात १७९० साली डॉ. सामुएल हानेमान या जर्मन वैद्याने केली. ‘समानाला समान बरे करते’ (लॅटिन: Similia Similibus Curenture), या मूलभूत तत्त्वावर होमिओपॅथी आधारलेली आहे. म्हणजे लोखंडाने लोखंड कापावे, काट्याने काटा काढावा किंवा विषाने विष उतरवावे हे ते तत्त्व आहे. त्यामुळे या चिकित्सा पद्धतीला समचिकित्सा असेही म्हटले जाते. समचिकित्सेच्या नियमानुसार, निरोगी माणसाने एखाद्या रासायनिक किंवा जैविक पदार्थाचे सेवन केल्यामुळे त्याच्या शरीरात विशिष्ट आजाराची लक्षणे उद्भवत असतील तर होमिओपॅथीनुसार त्या आजारावर (किंवा तत्सम लक्षणे असलेल्या आजारावर) औषध म्हणून तोच पदार्थ सूक्ष्म प्रमाणात दिला जातो, अशीही माहिती डॉ. चांडक यांनी दिली आहे.