परभणी - मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्तचे पाणी तर मुरले नाही, पण या योजनेचा पैसा मात्र मोठ्या प्रमाणात मुरला आहे. मुख्यमंत्र्यांना सत्तेची मस्ती आली आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी काही फुटावर असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारसुद्धा घातला नाही. धुळे येथील कालचीच ही घटना असून, हार घातला असता तर तुमच्या हाताला रोग झाला असता का? अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
ते पाथरी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पाथरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या इमारतीचे उद्घाटन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तसेच ते शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.