परभणी - शहरातील स्वावलंबी महिला बचत गटाच्या माध्यमातून तालुक्यातील मुरुंबा, देवठाणा आणि आसोला परिसरात 7 पोल्ट्रीफार्म चालवले जातात. या शिवाय साबा, पिंपळगाव, पांढरी, रहाटी आणि साटला या 10 किमी परीसरातील गावांमध्ये एकूण 19 पोल्ट्रीफार्म सुरू आहेत. मात्र, या व्यवसायावरच अचानक 'बर्डफ्लू' चे संकट आल्याने बचत गटातील महिला आणि गावांमधील शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरच कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे प्रशासनाने या कोंबड्या नष्ट करण्यापूर्वी महिला आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वावलंबी पोल्ट्रीफार्म प्रकल्पाचे संचालक सुशील कांबळे यांनी केली आहे.
2 हजाराहून अधिक कोंबड्या पावल्या मरण -
परभणी तालुक्यातील मुरुंबा आणि देवठाणा येथील 4 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना 'बर्ड फ्लू' ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच याचा संसर्ग मुरुंबा गावाच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांमध्ये असलेल्या 19 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून या ठिकाणच्या 2 हजाराहून अधिक कोंबड्या अचानक मरण पावल्या आहेत. ज्यामुळे महिला आणि शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
भूल देऊन कोंबड्यांना देणार दयामरण -
हा बर्ड फ्लूचा संसर्ग अन्य भागात पसरू नये, म्हणून प्रशासनाच्या वतीने मुरुंबा व परिसरातील 1 किमी वरील 5 पोल्ट्री फार्म मधील सुमारे 8 हजाराहून अधिक कोंबड्या नष्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्यावतीने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणच्या पोल्ट्री फार्म चालकांना काही औषधी देण्यात आली असून, या औषधीमुळे कोंबड्या सुस्त होतील. त्यानंतर त्या कोंबड्यांना दयामरण देऊन त्या नष्ट केल्या जाणार आहेत.
'संसर्गाचा अटकाव होईल, मात्र उपजीविकेचे काय? -
प्रशासनाने कोंबड्या नष्ट केल्या नंतर संसर्गाचा अटकाव होणार असला तरी महिला बचत गटातील महिला आणि या गावातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. हे सर्व प्रकल्प उभे करण्यासाठी परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी महिला पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत देऊन या महिला बचत गटांना आपल्या पायावर उभे केले होते. तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेकडो शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना सहभागी करून घेत त्यांच्यासाठी एक उद्योग निर्माण केला होता.
'महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प -
दरम्यान, हा प्रकल्प महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प असून, याला लेअर पोल्ट्री फार्म प्रकल्प असे म्हटले जाते. या प्रकल्पाच्या माध्यमातून अंडे निर्मितीसाठी कोंबड्या तयार केल्या जातात. गेल्या चार ते पाच महिन्यात हा प्रकल्प उभा राहिला होता. आताशी कुठे कोंबड्या अंडी देण्यास सुरुवात करणार होत्या. त्यातून उत्पन्न सुरू होणार की हे संकट आले. ज्यामुळे शेतकरी आणि महिला देखील हवालदिल झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने या कोंबड्या नष्ट करण्यापूर्वी महिला आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी या प्रकल्पाचे संचालक सुशील कांबळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली आहे.
हेही वाचा - बॉलिवूड ट्विट प्रकरण; कंगनाला मुंबई उच्च न्यायलयाचा दिलासा कायम