परभणी - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात 14 एप्रिलपासून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यापूर्वीच परभणी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र तरी देखील रुग्णांमध्ये वाढ सुरूच होती. परंतु आता गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनचा परिणाम दिसून येत आहे. परिणामी, काल (रविवार) पासून नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे परभणीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2 दिवसांत 1 हजार 355 रुग्णांची कोरोनावर मात
परभणी जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शनिवारपासून कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचा परिणाम देखील 'ब्रेक द चैन' साठी होताना दिसून येत आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत तब्बल 1 हजार 355 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या दोन दिवसात 1 हजार 62 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गेल्या महिन्याभरापासून सातत्याने दररोज बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्याने आढळणारे रुग्ण जवळपास दुपटीने वाढत होते. मात्र, यात आता फरक जाणवत असून, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.
जिल्ह्यात साडेपाच हजार सक्रिय रुग्ण
परभणी जिल्ह्यात सध्य परिस्थितीमध्ये 5 हजार 554 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 671 कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एकूण जिल्ह्यात आजपर्यंत 26 हजार 87 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या असून, त्यापैकी 19 हजार 862 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. दरम्यान, आतापर्यंत 2 लाख 13 हजार 306 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 86 हजार 452 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह तर 25 हजार 939 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह व 775 अनिर्णायक आणि 140 नमुने नाकारण्यात आले आहेत.
हेही वाचा - 'कोणताही राजकीय पक्ष परस्पर रेमिडेसिवीर ताब्यात घेऊ शकत नाही, भाजपने काय केले माहित नाही'