परभणी - जिल्ह्यातील पूर्णा तालुक्याच्या कातनेश्वर येथे विजेचा धक्का लागल्याने मुलगा आणि आईचा मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवारी) घडली. या दुर्घटनेत महिलेचा दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कातनेश्वर येथील बबनराव चव्हाण यांच्या घरासमोर असलेल्या खांबाच्या तारेत सकाळी वीज प्रवाह उतरला. त्याचावेळी या तारेस घरातील 24 वर्षीय आकाशचा स्पर्श झाल्याने त्यास जोरदार धक्का बसला. त्याचा आवाज ऐकून त्याची आई जिजाबाई चव्हाण तातडीने मदतीसाठी धावल्या. त्याला वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही विजेचा धक्का लागल्याने त्याही कोसळल्या. यावेळी दुसरा मुलगा देखील त्यांच्या मदतीसाठी धावला. त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यामुळे या तिघांची अवस्था पाहून परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यांनी तातडीने वीजप्रवाह बंद करीत तिघांनाही परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना जिजाबाई (45) व त्यांचा मोठा मुलगा आकाश यांना मृत घोषित केले. तर दुसर्या धाकट्या जखमी मुलावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, आकाशचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते. या घटनेने कातनेश्वर गावात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. तर वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.