परभणी - दोन वर्षांपासून रखडलेल्या परभणी-जिंतूर या राष्ट्रीय महामार्गाची एकही बाजू पूर्ण झालेली नाही. औरंगाबाद-नांदेड या राज्य महामार्गा अंतर्गत जिंतूर ते परभणी हा सुमारे पावणे तीनशे कोटी रुपयांचा सिमेंट रस्ता 2017 साली सुरू करण्यात आला होता. या कामाला 19 सप्टेंबर 2019 रोजी पूर्ण करण्याचे आदेश आहेत. परंतु, गेल्या एक वर्षापासून हे काम बंद आहे. अर्धवट झालेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी मुरूम टाकण्यात आला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर प्रचंड चिखल झाला आहे. वाहने घसरून पडण्याच्या व अडकून बसण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
परभणी- जिंतूर या महामार्गाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. या महामार्गाच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्याचे काम अवघ्या काही दिवसांतच संबंधित कंत्राटदाराने केले. त्यानंतर अचानक हे काम थांबविण्यात आले. रस्त्यावर खड्डे असल्याने एकावेळी दोन वाहने प्रवास करू शकत नाहीत. या सर्व परिस्थितीत प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
या सर्व प्रकाराला संबंधित कंत्राटदार जबाबदार असून सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हा रस्ता दर्जेदार करून घ्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.