परभणी - जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून ते 31 मार्चपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू केल्याचे आदेश सोमवारी जारी केले आहेत. याशिवाय इतरही काही कडक उपाययोजना जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी लागू केल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटावी, म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच परभणीत ये-जा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निर्बंध लावले आहेत. तर शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना रेणुका मंगल कार्यालयात अलगीकरण करून त्यांची आरटीपीसीआर तपासणी होणार आहे. शिवाय शहरातील कोविड सेंटरवरील व्यवस्थापन आणि ऑक्सीजनसह अन्य तातडीचे निर्णय घेण्यासाठी सनियंत्रण अधिकार्यांची नियुक्ती करत त्यांना कामाच्या जबाबदारीचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा - गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली सह्याद्री अतिथीगृहात गोपनीय बैठक
विनामास्क फिरणाऱ्यांचे अलगीकरण -
बाजारपेठेसह रस्त्यावरून विनामास्क फिरणार्या व्यक्तींना यापुढे दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल. तसेच त्यांना एक दिवस रेणूका मंगल कार्यालयात क्वारंटाईन व्हावे लागेल. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी मास्क वापरण्याबाबत नागरिकांना वारंवार सूचना देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे अशा नागरिकांना एक दिवस क्वारंटाईन ठेवण्यासोबतच आरटीईपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. यास विरोध करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा पोलिस अधीक्षकांसह मनपा आयुक्तांवर आहे.
हेही वाचा - लोकसभेमध्ये आपल्याला धमकावल्याचा नवनीत राणांचा आरोप; तसं काही नसल्याचं सावंत यांचं स्पष्टीकरण
24 तासात 315 कोरोनाबाधीतांची भर; तिघांचा मृत्यू -
सोमवारी दिवसभरात तब्बल 315 कोरोनाबाधीत आढळले असून, तिघा कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला. तर 45 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा व खासगी कोरोना रुग्णालयात सध्या 984 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 353 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 11 हजार 11 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 9 हजार 674 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 51 हजार 218 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 39 हजार 627 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 10 हजार 858 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 593 अनिर्णायक व 140 नमुने नाकारले गेले आहेत.
हेही वाचा - हॉटेल चालकाला लुटणाऱ्या दोघांना अटक
प्रशासनाद्वारे सनियंत्रण अधिकार्यांची नियुक्ती -
कोरोना संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असून, त्यासाठी शहरात असलेल्या कोविड सेंटरवर व्यवस्थापनासह ऑक्सीजनसह तातडीने निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सनियंत्रण अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. यात रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी डॉ.अरुण जर्हाड, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) बी.एच. बिबे, उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) निवृत्ती गायकवाड, जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.आय.ओ. सुनील पोटेकर, नायब तहसीलदार रामदास कोलगणे, तहसीलदार सुरेखा नांदे, नायब तहसीलदार अशोक मिरगे, तहसीलदार संजय बिरादार यांच्यासह नायब तहसीलदार वंदना मस्के, नायब तहसीलदार दळवे, कैलास वाघमारे, शीतल कच्छवे, मीनाक्षी तमन्ना, श्रीरंग कदम, माधव वडजे, हरीश टाक आदींवर शहरातील कोविड सेंटरवर देखरेखीची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कोविड रुग्णांना लागणार्या ऑक्सीजनची व्यवस्था, पुरवठा, लसीकरण, आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल घेणे, वॉर रुम, हॉस्पिटल व्यवस्थापन, कोविड सेंटरच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.