परभणी - गेल्या काही वर्षांत दुष्काळ शेतकऱ्याचा पिच्छा सोडायला तयार नाही. यावर्षीपेक्षा गत वर्षच चांगले होते, असे म्हणायची वेळ आली आहे. या वर्षीदेखील जिल्ह्यात लहरीपणाने बरसणारा वरुणराजा मागील 12 दिवसांपासून पुन्हा रुसला आहे. पेंडओलीवर केलेल्या पेरण्या कोवळी रोपे होऊन करपत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ 27.2 टक्केच पाऊस झाल्याने शेकऱ्यांसह सामान्य नागरिकांची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 774.62 मीमी एवढी आहे. एक जूनपासून 24 जुलैपर्यंत 290 मीमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, जून महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये झालेल्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. परंतु, संपूर्ण मौसमात आतापर्यंत केवळ 147 मीमी पाऊस झाला. ही सरासरी अपेक्षित पावसाच्या केवळ 47 टक्के असून वार्षिक सरासरीच्या केवळ 27 टक्के आहे. परिणामी कोवळी पिके करपून जात आहेत. तर चारा आणि पिण्याच्या पाण्याचेही संकट गंभीर होत चालले आहे.
जिल्ह्यातील काही भागात पाऊस लहरीपणाने बरसला. त्यामुळे काही भागांत जूनमध्ये पेरण्या झाल्या तर काही भागांत जुलैमध्ये पेरण्या झाल्या. मात्र पाऊस मोठा कधीच झाला नाही. पेंड ओलीवर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र गत पंधरा दिवसांपासून पाऊस बंद आहे. दररोज कडक उन पडत असल्याने शेकरी हवालदिल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जमिनित पुरेशी ओल नसल्याने आता कोवळी पिके करपत असून शेतशिवार सुनेसूने दिसत आहे. चिंताग्रस्त शेतकरी गावकुसातील मारोती मंदिर, झाडे, सुताराचा नेवा या ठिकाणी एकत्र येत चिंताग्रस्त चेहरे घेऊन बसलेले दिसून येत आहेत. सततच्या दुष्काळानंतर पाऊस झाल्यास पुन्हा पेरावं काय आणि पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून? या चिंतेत शेतकरी दिसून येत आहेत. गोठ्यात आड्याला बांधलेली जनावरेही बिना रवंथाचे आकाशाकडे डोळे लाऊन मूक हंबरडा फोडत धन्याच्या चिंतेत सहभागी होताना दिसत आहेत.
आता पाऊस झाल्यास सोयाबिन पीक येणार नाही. कापूसही येत नाही. मुगाचा पेरणी हंगाम निघून गेला आता केवळ रब्बीची ज्वारी करता येऊ शकते, असे शेतकरी सांगतात. मात्र, सततच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मोठ्या कसरती करत बियाणे आणून काळ्या आईची ओटी भरली होती. मात्र पुन्हा निसर्गाचा कोप शेतकऱ्यांवर होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पाथरीत भयावह परिस्थिती -
पाथरी तालुक्यात पावसाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. आजपर्यंत केवळ 114.67 मीमी पाऊस झाला आहे. यात वाघाळा, कान्सूर, लिंबा, मुदगल, फुलारवाडी, बाभळगाव, लोणी बु., उमरा, आंधापुरी, गुंज या गावांमध्ये सरासरीच्या पाव टक्कापण पाऊस झाला नाही. पेरणीनंतर चार-पाच दिवसातच हालक्या रानातील मूग, सोयाबीन, कापूस माना टाकून करपतांना दिसत आहेत.