परभणी - शहरातील जुना पेडगाव रोडवरील एका 45 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनामुळे झालेला हा सातव्या रुग्णाचा मृत्यू आहे. परभणी जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 263 वर गेली आहे. 140 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
परभणी शहरातील आनंद नगरात राहणाऱ्या एका 34 वर्षीय रुग्णाचा रविवारी नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्या रुग्णाला अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यात तो मरण पावला. त्या प्रमाणेच आज परभणी जिल्हा रुग्णालयातील संक्रमित कक्षात उपचार घेणाऱ्या 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. शहरातील जुना पेडगाव रोड भागातील रहिवाशी असलेल्या या रुग्णाला इतर काही आजार देखील होते. त्यामुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार करण्यात येत होते. त्यातच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने संक्रमित कक्षात ठेवण्यात आले होते. हा जिल्ह्यातील कोरोनाचा सातवा बळी आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 263 झाली आहे. रविवारी एका दिवसात मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ झाली. यात गंगाखेड 37, परभणी 7, सेलू 1 आणि जिंतूर तालुक्यातील कावी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत एकूण 3 हजार 183 संशयितांची नोंद झाली आहे. यातील 2 हजार 992 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 35 अहवाल प्रलंबित आहेत.
263 पैकी सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 116 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर उर्वरीत 140 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.