परभणी - जिल्ह्यातील एकमेव कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मानसिकदृष्ट्या तो खचून जाऊ नये, म्हणून त्याचे समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण आणि तालुकास्तरावरील निर्वासितांच्या शिबिरात राहणाऱ्यांचे देखील वैद्यकीय समुपदेशन होत आहे.
दरम्यान, सोमवारी परभणी जिल्ह्यामध्ये नवीन 14 संभाव्य रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांच्यासह यापूर्वीच्या संभाव्य रुग्णांच्या नमुण्यांचे तपासणी अहवाल मोठ्या संख्येने प्रलंबित आहेत. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोना विषाणू संदर्भात सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत परभणी जिल्हा रुग्णालयात 543 संशयितांची नोंद झाली आहे. मात्र, त्यापैकी 481 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. परंतु, त्यातील 415 अहवाल निगेटिव्ह असून केवळ एका रुग्णाचा स्वॅब पॉझिटिव्ह आलेला आहे. सद्यस्थितीत 48 स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत. तर 17 स्वॅब राष्ट्रीय विषाणू संस्था व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे.
दरम्यान, आतापर्यंत परभणी जिल्ह्यात एकूण नोंद झालेले संशयित 543 रुग्ण असून त्यापैकी विलगीकरण केलेले 248 आहेत. तर, हॉस्पिटलच्या संसर्गजन्य कक्षात 41 जण ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी विलगीकरणाचा कालावधी पुर्ण करणारे 254 जण असून ते परदेशातून किंवा पुणे-मुंबई व इतर मोठ्या शहरातून आलेले होते. विशेष म्हणजे परभणीत परदेशातून आलेले 62 जण असून आणि त्यांच्या संपर्कातील 6 जण होते, या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. सोमवारी दाखल 14 आणि रविवारचे 12 अशा 26 संशयितांचा नमुना (स्वॅब) तपासणीसाठी पाठविण्यात आला असून या पूर्वी प्रलंबित असलेल्या 48 अशा एकूण 74 जणांच्या अहवालाची सर्वांना प्रतीक्षा आहे.