परभणी - जिल्ह्यात आज चार नवे रुग्ण आढळले. यामध्ये मानवत शहरातील तीन तर जिंतूर तालुक्यातील डोंगरतळा येथील 1 रूग्ण करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हे अहवाल नांदेडहुन सोमवारी रात्री दहाच्या सुमारास प्राप्त झाले.
या नवीन रुग्णांसह परभणीत कोरोनाबधितांची संख्या 86 वर पोहोचली आहे. त्यापैकी 25 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर दोघांचा मृत्यू झाला असून कोरोना हॉस्पिटलमध्ये उर्वरीत 59 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आज कोरोना रुग्णालयातून 24 कोरोनाबाधितांना सुट्टी देण्यात आली आहे. या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, सध्या त्यांच्यात कोरोनाचे कुठलेही लक्षणे नसल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मात्र असे असले तरी सद्य परिस्थितीत नांदेडच्या प्रयोगशाळेत परभणीच्या तब्बल 238 संभाव्य रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याने परभणीकरांची चिंता मात्र कायम आहे.
आज सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालयात केवळ 13 संशयीत दाखल झाले आहे. गेल्या पंधरा दिवसात दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या 50 ते 100 होती. तर आजच्या 13 संशयितांसह परभणी जिल्ह्यातील एकूण संशयितांची संख्या 2 हजार 344 वर पोहचली आहे. यातील 238 संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आहेत. शिवाय आतापर्यंत 2 हजार 80 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर एकूण 82 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आहेत. शिवाय 70 संशयितांचे अहवाल अनिर्णायक असून 31 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही निर्वाळा मिळाला आहे. या प्रमाणेच जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या विलगिकरण कक्षात 545 तर रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 288 जणांना ठेवण्यात आले आहे. यापूर्वी विलगिकरणाचा कालावधी पूर्ण करून घरी परतणाऱ्यांची संख्या 1 हजार 511 आहे.
दरम्यान, आज जिल्हा शासकीय रुग्णालयातून 14 जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. तर यापूर्वी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तसेच 14 दिवस करून उपचार घेतलेल्या 24 रुग्णांचे अहवाल आज जिल्हा रुग्णालयाला निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच या २४ रुग्णांमध्ये सध्या कुठलीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे त्या सर्वांना जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.