परभणी - जिल्ह्यातील मानवत येथील गौड गल्लीत राहणारी 14 वर्षाची मुलगी कोरोनामुक्त होऊन घरी परतली. मात्र, आरोग्य यंत्रणेने या मुलीची नोंद कोरोनाबाधित मृतांमध्ये केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे या मुलीच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला, तर जिल्हा आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तसेच यापूर्वी अनेक भोंगळ कारभाराच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समित्यांचा अहवाल गुलदस्त्यात असल्याने अशा प्रकारांमध्ये वाढ होत आहे.
परभणी जिल्हा रुग्णालय आणि एकूणच आरोग्य यंत्रणेचे अनेक भोंगळ कारभार या कोरोना संसर्गाच्या काळात उघडकीस येत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने यापूर्वी एका डायलिसिसच्या रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर पूर्णा आणि गंगाखेड या दोन शहरांमधील कोरोनाबाधित महिलेच्या नावातील साधर्म्यमुळे चक्क कोरोनाबाधित महिलेलाच डिस्चार्ज दिला. त्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याला मध्यरात्री त्याच्या घरातून उचलून नेत कोरोनाबाधित म्हणून कोरोना संसर्ग कक्षात नेऊन बसवले होते. यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या जेवणामध्ये मेलेले मुंगळे आढळून आले आहेत. हे प्रकार कमी होते की काय पुन्हा काल (मंगळवारी) रात्री जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात मानवतच्या एका 14 वर्षीय मुलीला कोरोनामुळे मृत झाल्याचे दाखविण्यात आले; मात्र प्रत्यक्षात या मुलीला कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज मिळाला होता. डिस्चार्जच्या जागी डेथ अशा शब्दाचा उल्लेख झाल्याने या मुलीला चक्क मयतांच्या यादीत नेऊन बसवले. हा प्रकार आज शुक्रवारी उघडकीसकी येताच या मुलीच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
यापूर्वी अशा पद्धतीने घडलेल्या घटना आणि जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराच्या प्रत्येक घटनेबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समित्यांचा अहवाल तात्काळ देण्याचे आदेश देखील त्यांनी बजावले होते; मात्र गेल्या दोन महिन्यात एकाही चौकशी समितीचा अहवाल जाहीर झालेला नाही. सर्व अहवाल गुलदस्त्यात असून एकाही दोषींवर कारवाई न झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार असाच सुरू आहे.
मानवत प्रकरणी मुलीच्या नातेवाईक आणि इतर काही जागरूक नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधून हा प्रकार उघडकीस आणला. तसेच या प्रकाराबाबत खुलासा व्हावा, असा सूर व्यक्त केला होता. त्यानंतर शासकीय रुग्णालय व आरोग्य खात्याने ती माहिती अक्षराच्या घोळामुळेच म्हणजे डिस्चार्ज ऐवजी डेथ असा समज झाल्याने प्रेसनोटमधून माध्यमांना दिल्याचे स्पष्ट केले.