परभणी - मध्यप्रदेश, गुजरातनंतर आता परभणीतून कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तेलंगाणा राज्यातील १८१ मजुरांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. याशिवाय ४६ प्रवासी पुण्यात नेऊन सोडण्यात आले आहेत. यासाठी परभणीतून आज (बुधवार) दहा बस रवाना झाल्या आहेत.
परभणी जिल्ह्यात विविध व्यवसाय आणि कामानिमित्त आलेल्या परराज्यातील नागरिकांची लॉकडाऊनमुळे अडचण होत होती. खाण्या-पिण्यासाठी विविध सेवाभावी संस्था आणि जिल्हा प्रशासन व्यवस्था करत असले तरी या नागरिकांना आपल्या घराची ओढ लागली होती. त्यानुसार अनेकजण प्रशासनाकडे स्वजिल्ह्यात जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करत होते. राज्य शासनाने नियोजित केलेल्या मोफत बसचा फायदा या नागरिकांना होत आहे.
दरम्यान, तेलंगाणा राज्यातील ६८, कर्नाटकातील २१ आणि उत्तर प्रदेशातील ९२ असे एकूण १८१ मजूर तर पुण्यातील ४६ मजूर परभणी जिल्ह्यातील विविध भागात लॉकडाऊनमुळे अडकले होते. आज, बुधवारी या सर्व मजूरांना बसमधून राज्याच्या सीमेपर्यंत मोफत प्रवासाची सोय जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या आदेशाने करण्यात आली. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन या मजुरांकडून करून घेण्यात आले.
या मजुरांपैकी तेलंगाणा राज्यातील ६८ जणांना हैदराबादपर्यंत तर कर्नाटकातील २१ मजुरांना बिदरपर्यंत आणि उत्तर प्रदेशातील ९२ मजुरांना औरंगाबाद येथील रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यात आले. या प्रमाणेच सेलू येथून पुणे तालुक्यातील मुळशीपर्यंत ४६ मजुरांना पोहचविण्यात आले आहे. यासाठी परिवहन महामंडळाच्या १० बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.