परभणी - 'कोरोना' रुग्णांची संख्या कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये महाविद्यालये सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज परभणीत सांगितले. या संदर्भात त्यांनी परभणी जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यातील 'कोरोना' परिस्थितीचा अहवाल पाठविण्यास सांगितला आहे. तर, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकसारखी परिस्थिती नसल्याने त्या त्या जिल्ह्याचा आढावा घेऊनच त्या ठिकाणी पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेने महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
हेही वाचा - खासदार जाधवांसंबंधी आणखी एक नवा वाद; ते राजकीय संन्यास घेणार का? राष्ट्रवादीचा सवाल
परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून पाठविण्यात आलेल्या 8 व्हेंटिलेटरचे उद्घाटन उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यानंतर सांयकाळी आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार बाबाजानी दुर्रानी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळ, जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, मनपा आयुक्त देविदास पवार आदी उपस्थित होते.
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन व्हेंटिलेटरची उपलब्धता
दरम्यान, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता आहे. तसेच, सध्या एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग ओसरत असताना काही जिल्ह्यांमध्ये मात्र रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. हीच धोक्याची बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून करण्यात येत असल्याचे सामंत यांनी सांगितले. त्यानुसार नांदेड, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांचा दौरा करत हे व्हेंटिलेटर दिल्याचे देखील ते म्हणाले.
'आपत्ती व्यवस्थापना'कडे अहवाल पाठवण्याचे आदेश
विशेष म्हणजे परभणी, नांदेड, हिंगोली तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. परभणीत तर अनेक दिवस 5 च्या खाली रुग्ण एका दिवसात आढळून आलेली आहेत. आज तर केवळ एक रुग्ण परभणीत आढळून आल्याचे ते म्हणाले. अशा परिस्थितीत आपण जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा अहवाल आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवून महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्यास सांगितल्याचे ते म्हणाले.
40 लाख विद्यार्थ्यांसह कुटुंबाचा प्रश्न
राज्यातील व परभणी जिल्ह्याची कोरोना परिस्थिती पाहून महाविद्यालय किती क्षमतेने चालू करायचे ते देखील ठरवण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. 'तत्पूर्वी महाविद्यालयांचे संपूर्ण सॅनिटायझेशन करणे तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण करणे आवश्यक आहे. कारण संपूर्ण राज्यात उच्च शिक्षण घेणारे 40 लाख विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचा देखील प्रश्न असल्याचे ते म्हणाले. त्या दृष्टिकोनातून आपण जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व सूचनांचे पालन करून जिल्हा प्रशासनाने सकारात्मक अहवाल दिल्यास आपण जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
हेही वाचा - कृषी क्षेत्राच्या विकासासाठी संशोधकांनी आपले सर्वोत्तम योगदान द्यावे -राज्यपाल