परभणी - उत्तराखंड राज्यात प्रसिद्ध हरकीदून हा गिर्यारोहकांचा आवडता दुर्गम पर्वत आहे. हौशी व धाडसी गिर्यारोहक समुद्रसपाटीपासून 14 हजार फूट उंचीवर असलेल्या या पर्वताची गिर्यारोहणासाठी आवडीने निवड करतात. त्यानुसार परभणीचे हौशी गिर्यारोहक तथा सामजिक कार्यकर्ते आणि सर्पमित्र रणजित कारेगावकर व विष्णू मेहत्रे यांनी हा पर्वत सर केला. यासाठी त्यांना अनुभवी गिर्यारोहक हर्षादित्य बिजापुरी, सौरभ सेमवाल व रामलाल गाईडचे मार्गदर्शन मिळले. त्यांनी हा पर्वत 20 ते 22 नोव्हेंबर या तीन दिवसात सर करून उतरला देखील.
प्रथम डेहराडून शहरापासून 250 किमी दूर असणाऱ्या सांकरी गावातून तालुका या गावी ते पोहोचले. तेथून प्रचंड चढउतार व वेड्यावाकड्या दुर्गम पायवाटेवरून पायी प्रवास केला. प्रत्येकाच्या पाठीवर 15 ते 30 किलो वजनाची एक बॅग होती.
'ध्येयापर्यंत जायचे असेल तर सर्वांना मिळून चालावे लागेल'
तुम्ही जोरात चालणार असाल तर एकटे चालाल आणि ध्येयापर्यंत जायचे असेल तर सर्वांना मिळून चालावे लागेल, असे सदर गिर्यारोहकांना सुरुवातीलाच मोहीमप्रमुख हर्षादित्य बिजापुरी यांनी सांगितले होते. सर्वांनी एकत्र चालत, वाटेत राहण्यायोग्य जागा बघून निसर्गाच्या सान्निध्यात भोजन तयार करून त्याचा आनंद घेतला. नैसर्गिक धबधबे, झरे, झाडे, बर्फ, पक्षी, डोंगर, दऱ्या, चांदणीरात्र व सुपीन नदीचा खळखळाट यांचा मनसोक्त आनंद घेत व उणे 10 अंश सेल्सिअस तापमानाच्या थंडीत एकमेकाला धीर देत रात्र काढत हे गिर्यारोहण त्यांनी तीन दिवसात पूर्ण केले.
परतीच्या वेळी सकाळी सहकारी सौरभ सेमवाल हे नजरचुकीने निसरड्या बर्फावरून पाय घसरून जोरात पडले. त्यांना मुक्का मार लागला. कडाक्याच्या थंडीत त्यांना चालणेही अवघड झाले होते. सर्वांनी त्यांना धीर दिला. अनुभवी मोहीमप्रमुख हर्षादित्य यांनी त्यांना सावरत अवजड बॅग व स्वतःचीही तितकीच मोठी बॅग घेऊन, ती निसरड्या वाटेच्या पर्वताखाली नेऊन ठेवली. नंतर परत येऊन सौरभ यांना आधार देत दहा किमीपर्यंत घेऊन गेले. एके ठिकाणी त्यांना झोपवून त्यांची स्ट्रेचिंग करून आराम दिला व चालण्यायोग्य केले.
पर्वतरांगातील गिर्यारोहनाचा अनुभव -
गिर्यारोहणात प्रत्येक सदस्याला सावरून सोबत घेणे जमलेच पाहिजे. निसरड्या वाटेत श्वासावर लक्ष ठेवून एकाग्रतेने चालणे हेही एक प्रकारचे मेडिटेशनच असते, असे बिजापूरी यांनी सांगितले. वाटेत महिला गिर्यारोहक परिता राणा यांनी गाईड म्हणून कार्य केले. तर परभणीचे रणजित कारेगावकर व विष्णू मेहत्रे यांचा हा हिमालय पर्वतरांगातील गिर्यारोहणाचा पहिलाच अनुभव होता. या गिर्यारोहन व पर्यटन प्रवासातून खूप काही शिकायला मिळाले, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बर्फांनी वेढलेल्या सुंदर पर्वत रांगांचे दर्शन -
हरकीदून हा गोविंद राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणारा हिमालय पर्वतरांगांतील एक निसर्गरम्य पर्वत असून सुपीन नदीचा इथे उगम होतो. या पर्वताच्या बाजूला स्वर्गरोहिणी, श्रीखंड व जोंधरा आदी बर्फांनी वेढलेल्या सुंदर पर्वत रांगांचे दर्शन होते. या प्रवासात डोंगरकुशीत आपणास छोट्याछोट्या सुंदर घरांनी वसलेले पूर्ती, ढाटमीर, गंगाड, पवाणी आणि ओसला आदी गावे दिसतात. तेथील गढवाली जीवन पद्धतीचे आपणास जवळून दर्शन घडते, अशी माहिती कारेगावकर यांनी दिली.
हरित व फुलापानांनी वेढलेला परिसर -
हरकीदून पर्वताच्या गिर्यारोहणासाठी जायचे असल्यास डेहराडूनवरून बसने किंवा कारने सांकरी मार्गे तालूका गावातून जाऊ शकतो. मार्च ते मे महिन्यात खूप हरित व फुलापानांनी वेढलेला परिसर असतो. त्यावेळी हौशी गिर्यारोहक व पर्यटकांची अजूनच गर्दी असते. वनविभागाकडून परवानगी घेऊन गिर्यारोहणास जावे लागते.