परभणी - पुलावामा हल्ल्यापूर्वी, अशा प्रकारच्या हल्ल्याची शक्यता असल्याची माहिती सरकारला मिळाली असतानाही त्यांनी जवानांना एअरलिफ्ट करून नेले नाही. त्यांच्या वाटेतील वाहतूक थांबवली नाही. तो आरडीएक्सचा साठा यांना का रोखता आला नाही. त्यामुळेच पुलवामामध्ये घडलेल्या घटनेत सीआरपीएफच्या ४३ जवानांसह अन्य ६९ जवानांना वीर मरण पत्करावे लागले, असा आरोप भुजबळ यांनी केला आहे.
सीमेवर १९४७ पासून देशाचे सैनिक उभे आहे. मग ते मोदींची सेना कसे होतील ? असा सवालही त्यांनी यावेळी केला. परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारनिमित्त आलेले छगन भुजबळ पूर्णा येथे पत्रकारांशी बोलत होते.
भुजबळ म्हणाले, सरकारला आधीच कळविण्यात आले होते की, पुलवामा इथून जाणाऱ्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला होण्याचा धोका आहे. तरीदेखील ते तो आरडीएक्स रोखू शकले नाहीत, त्या ठिकाणची ट्राफिक थांबवू शकले नाही किंवा त्या जवानांना लिफ्ट करून त्यांनी नेले नाही. या सर्वाची जबाबदारी मोदींनी घ्यायला पाहिजे. पण मोदींनी तसे केले नाही. त्यांच्या विरोधातल्या प्रश्नांवर ते बोलत नाहीत. त्यांच्याविरुद्ध बोलले की देशद्रोही म्हटले जाते. ते केवळ पाकिस्तानविरुद्ध बोलतात. मात्र, त्या ठिकाणची न बोलवता जाऊन बिर्याणीदेखील खातात, अशी टीकाही भुजबळ यांनी केली.
"फडणवीसांनी एमओयु करून महाराष्ट्राचे पाणी गुजरातला दिले"
महाराष्ट्रातल्या नारपार प्रकल्प आणि गोदावरी खोऱ्याचे पाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमओयु करून गुजरातला देऊ केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पत्राची कॉपीदेखील आपल्याकडे असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. हे पाणी जर गुजरातला दिले नसते तर ते पाणी मराठवाडापर्यंत पोहोचले असते. या पाण्यामुळे महाराष्ट्रातल्या भयंकर दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता, मात्र या पाण्याला महाराष्ट्र कायमचा मुकणार आहे, असाही इशारा भुजबळ यांनी यावेळी दिला.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी, उमेदवार राजेश विटेकर, आमदार मधुसुदन केंद्रे, प्राचार्य डॉ. किरण सोनटक्के, नानासाहेब राऊत, चक्रधर उगले आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.