परभणी/मुंबई - गेले दहा-पंधरा दिवस मंत्री नवाब मलिक यांना राज्याचा कुठलाही प्रश्न दिसत नाही. त्यांना फक्त आणि फक्त शाहरुख खानचा मुलगा दिसत आहे. बहुधा सरकार जाण्याची चाहूल लागल्यामुळे आपण बेरोजगार होऊ नये, म्हणून त्यांनी वकिली सुरू केली आहे. बॉलीवुड अभिनेता शाहरुख खानच्या मुलाचे पहिले वकीलपत्र त्यांना मिळाल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गुरुवारी पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी परभणीत आले होते. त्यानंतर सायंकाळी त्यांनी हॉटेल निरज येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार मेघना बोर्डीकर, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, भाजप शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, माजी आमदार विजयराव गव्हाणे, भाज पनेते गणेशराव रोकडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा-समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही - नवाब मलिक
जावयाला अटक केल्यामुळे नवाब मालिकांना झोंबले -
शाहरुख खानच्या मुलाचे वकीलपत्र घेण्यासोबतच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना त्यांच्या जावयाला अटक झाल्याचे जास्त झोंबले आहे. वारंवार या प्रकरणात त्यांच्या बोलण्यामागे वकीलपत्र आहे. पण जावयाला अटक केल्याचे मोठे कारण असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.
हेही वाचा-अन्न वाटपात पालिका प्रशासनाकडून 130 कोटींचा घोटाळा, रवी राजांचा आरोप; चौकशीची मागणी
संपूर्ण मराठा समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे -
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संपूर्ण समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे. सर्व संघटनांनी आंदोलन करायला हवे. भारतीय जनता पक्ष त्यांच्यासोबत आहे. यामध्ये कुठलेही राजकारण भाजप करणार नाही. पण समाजाने रस्त्यावर उतरून त्यांचा हक्क मिळवायला पाहिजे, असेदेखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा-Aryan Khan Drug Case : आर्यनच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; ३० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच मुक्काम
शिवसेना-भाजप एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही
शिवसेना-भाजप वेगळे झाल्याची खंत चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकार्यांच्या बैठकीत व्यक्त केली होती. याला अनुसरून विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मात्र शिवसेना-भाजप एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही, असे स्पष्ट केले. आम्हाला आमची पार्टी मजबूत करायचे आहे. पुन्हा एकदा जागावाटप, जागेवरून वाद, पुन्हा ते दगा देणार, हे आता आम्हाला नको आहे. आम्ही स्वबळावर राज्यात सत्ता आणू, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज काढा -
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सारखे केंद्राकडे हात दाखवणे सोडा. राज्यातील नोकरदारांच्या पगारीसाठी तुम्ही कर्ज काढता, मग शेतकऱ्यांसाठी का नाही ? असा सवाल करताना त्यांनी शेतकऱ्यांना खऱ्या मदतीची गरज आहे. त्यांच्यासाठी कर्ज काढा, असा टोमणा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला. तसेच महाराष्ट्र सरकारकडे अजूनही दहा टक्के कर्ज काढण्याचे अधिकार आहेत, असेदेखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
एनसीबी आरोपांना भीक घालत नाही -प्रवीण दरेकर
क्रुझ पार्टी ड्रग्स प्रकरणात आर्यन खान व त्याच्या साथीदारांना एनसीबीने ताब्यात घेतल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सातत्याने एनसीबी वर रोज नवनवीन आरोप करत आहेत. परंतु एनसीबी या आरोपांना भीक घालत नाही असं सांगत नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केल्यापासून ते अस्वस्थ झाले आहेत, असा आरोप भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.