परभणी - लहान मुलांमधील भांडण विकोपाला गेल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना परभणी शहरात घडली आहे. ही घटना शहरातील गौस कॉलनी भागात घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांत 10 जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात झाला.
दुपारी झाले होते लहान मुलांचे भांडण
याबाबत शहरातील कोतवाली पोलिसांना अहमद खान सलीम खान (रा. गौस कॉलनी, दर्गा रोड) यांनी रविवारी (दि. 31 जाने.) तक्रार दिली आहे. तक्रारी नुसार शनिवारी (दि. 30 जाने.) रात्री उशिरा अहमद खान यांच्या राहत्या घरी गौस कॉलनी येथे ही घटना घडली. यातील आरोपींनी गैरकायद्याने मंडळी जमवून दुपारी झालेल्या लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून अहमद खान यांच्या पत्नी, आई व बहीण यांना शिवीगाळ करून मारहाण केली. ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी काठ्या, दगड व लोखंडी रॉडने अहमद खान व त्यांचे नातेवाईक यांना मारहाण केली. त्यात अहमद खान यांचे भाऊ माजित खान यांना डोक्यावर मार लागल्याने ते जखमी झाले. त्यांना सरकारी दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा आरोप करण्यात आल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी दिली आहे.
यांच्यावर झाला खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी सय्यद नकिद, सय्यद मोईन, सय्यद मोईन, सय्यद हाश्मी, सय्यद अब्दुल रहमान, सय्यद जिलानी, सय्यद अब्दुल इब्राहीम (सर्व रा. गौस कॉलनी) व अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'जीएसटी'तील किचकट तरतुदी विरोधात परभणीत आंदोलन