परभणी - दोन गटातील किरकोळ वादातून उंटावर कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची घटना सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे घडली आहे. माळेगावला यात्रेसाठी जात असताना पाल टाकून राहणाऱ्या भटक्या कुटुंबातील लोकांचा काही स्थानिक लोकांसोबत वाद झाला होता. मात्र, या वादात दुसऱ्या गटातील दोन जणांनी त्यांच्या उंटावर कुऱ्हाडीचा घाव घातल्याने तो ऊंट मरण पावला. यानंतर मारेकरी फरार झाले. याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा - अमित शाह यांच्याकडून नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर, विधेयकाच्या बाजूने 293 तर विरोधामध्ये 82 मते
जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील गुलाब समिंदर सय्यद हे भटके कुटुंब आपल्या उंटासह माळेगावच्या यात्रेकडे निघाले आहेत. 7 डिसेंबरला त्यांचा कबिला सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे मुक्कामी थांबला होता. मात्र, गायरान जमिनीवर ऊंट चारण्यावरून त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी या कुटुंबाशी वाद घातला. वाद घालणारे स्थानिक रहिवासी कांचन उर्फ राजु झुमाण्णा भोसले आणि पप्पु आनंता शहाजी शिंदे (रा. हरसिंगतांडा ता.सोनपेठ) या दोघांनी उंट गावातील गायरानात का चारतोस? या कारणावरून उंटास कुऱ्हाडीने गंभीररीत्या जखमी करून ठार मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा - हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी SIT गठीत, टीमचं नेतृत्व 'या' मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे
गंभीर जखमी झालेल्या उंटावर डॉक्टरांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु उपचारादरम्यान त्याचा तडफडून मृत्यू झाला. तर गुलाब समिंदर सय्यद यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलिसांनी रविवारीच गुन्हा दाखल केला आहे. मात्र, दोन्ही मारेकरी घटना घडल्यापासून फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.