परभणी - विवाहाच्या नवजीवनाची स्वप्ने रंगविणाऱ्या तरुणाला फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. पूर्णा तालुक्यात नवविवाहितेने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अंगावरच्या दागिन्यांसह पोबारा केला. हे लग्न जुळवून देणाऱ्या जालना येथील महिला व पुरुषाला पूर्णा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दिगंबर दत्तराव गडवे (३०) असे फसवणूक झालेल्या नवऱ्या मुलाचे नाव आहे.
दिगंबर गडवे हा पूर्णा तालुक्यातील कानडखेडा येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करतो. नारायण किशन आंधळे ( रा. जालना जिजामाता कॉलनी) हे १४ मे रोजी दिगंबर गडवे यांच्याकडे आले होते. आंधळे याने त्याच्यासाठी मुलीचे स्थळ आणले होते. त्यानुसार १६मे रोजी मुलगी बघण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यांना मुलगीही पसंत पडली. त्यानंतर लागलीच १८ मे रोजी लग्न करण्याचे ठरले.
पहिल्या मुलीनेही केला होता पोबारा-
ठरल्याप्रमाणे दिगंबर गडवे हे त्यांच्या काका रमेश गडवे, दिलीप गडवे आणि इतर नातेवाईकांसह जालना येथे लग्न करण्यासाठी म्हणून गेले होते. दुपारी एक वाजता मुलगी ब्युटी पार्लरला गेल्याचे सांगण्यात आले. परंतु सायंकाळी सात वाजले तरी मुलगी परत आली नाही. त्यामुळे कंटाळून गडवे कुटुंबीय बसस्थानकावर निघून आले. परंतु नारायण आंधळे यांनी बस स्थानकावर येऊन त्यांची समजूत काढली.
मुलीच्या अंगावर घातले अडीच तोळ्याचे सोने-
आंधळे यांनी तुम्हाला माझ्या मेहुणीची मुलगी दाखवतो, असे म्हणून परत त्यांना घरी नेले. त्या ठिकाणी पूजा नावाच्या मुलीला दाखवण्यात आले. ती मुलगी पसंत आली. यावेळी मात्र गडवे यांनी कानडखेड येथे लग्न लावून द्या, अशी अट घातली. मुलीची आई वारली असल्याने त्यांनी इतर कोणी नातेवाईक नाहीत. त्यामुळे मावस बहीण यशोदा पवार आणि स्वत: लग्न लावून देतो, असे आंधळे यांनी त्यांना आश्वासन दिले. त्यानुसार आंधळे याने 19 मे रोजी कानडखेड येथे जाऊन दिगंबर आणि पूजाचा विवाह लावून दिला. यावेळी गडवे कुटुंबीयाने पूजाच्या अंगावर सोन्याचे मनीमंगळसूत्र, एक लॉकेट, कानातले फुल, झुमके असे अडीच तोळे सोने आणि चांदीची चैन घातली होती.
लग्न झाल्यानंतर दुसर्याच दिवशी नारायण आंधळे कार घेऊन आले. त्यांनी काही कारणामुळे देवपूजेला वेळ लागणार असल्याने मुलीला घेवून जातो, असे सांगितले. तुम्ही नंतर येऊन तिला परत घेऊन या, अशी त्यांनी थाप मारली.
नववधू परतलीच नाही!
दिगंबर याचे काका दिलीप गडवे मुलीला आणण्यासाठी जालना येथे आंधळे यांच्याकडे २६ मे रोजी गेले होते. परंतु येथे पूजा घरी नाही, अशी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. गडवे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. काही दिवस त्यांनी पूजाची वाट पाहिली. परंतु ती परत आली नाही. त्यामुळे दिगंबर गडवे यांनी नारायण किसन आंधळे व यशोदा सुभाष नागरे आणि नवरी मुलगी पूजा या तिघांविरोधात फसवणूक केल्याची तक्रार दिली. त्यावरून 12 जून रोजी फसवणूक आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन आरोपींना पाच दिवसांची कोठडी, नववधू फरार-
पोलीस पथकाने तात्काळ नारायण किसन आंधळे याला अटक केली. तसेच यशोदा सुभाष नागरे या महिलेला गुरुवारी अटक करण्यात आली. पूजा मात्र अजूनही फरार आहे. नारायण आंधळे आणि यशोदा नागरे या दोघांनाही पोलिसांनी गुरुवारी न्यायालयापुढे हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची म्हणजे 18 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
विवाहइच्छुक मुलांना फसविणारे रॅकेट ?
विवाहइच्छुक मुलांना आमिष दाखवून त्यांना फसवण्याचे हे एखादे रॅकेट असू शकते, असा पोलिसांना संशय आहे. या दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत त्यांच्या या रॅकेटचा भांडाफोड होईल, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.