परभणी - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, मात्र असे होताना दिसत नाही. आज (गुरुवार) परभणी शहराच्या पश्चिमेकडून वाहणाऱ्या जायकवाडीच्या कालव्यात पोहण्यासाठी शेकडो तरुणांची झुंबड उडाली होती. ज्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला. याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होताना दिसत असून या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जवळपास दीड महिना ग्रीन झोनमध्ये असलेल्या परभणी जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यापासून आजपर्यंत 67 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे; मात्र असे असताना काही नागरिक सोशल-डिस्टन्सिंगचा फज्जा उडवताना दिसत आहेत.
दरम्यान, सध्या परभणी जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रासाठी उजव्या आणि डाव्या कालव्याच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी शेती सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी वापरण्यात येते. मात्र, असे असताना या पाण्यावर अनेक ठिकाणी काही तरुण पोहण्याचा आनंद घेताना दिसतात. परंतु, सध्याची परिस्थिती तशी नाहीये. कोणीही एकत्र न जमता, सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन शासन-प्रशासन वारंवार करत आहे. त्यासाठी कडक नियम, कायदेही करण्यात आले आहेत. अनेकांवर कारवाई देखील होत आहे. मात्र, असे असले तरी आज परभणी शहराच्या पश्चिम दिशेने वाहणाऱ्या जायकवाडीच्या कालव्यावर शेकडो तरुणांची पोहण्यासाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले.
याठिकाणी साधारणपणे दोनशे ते तीनशे तरुण पोहण्याचा आनंद घेत होते. मात्र या दरम्यान कुठेही सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नव्हते. शिवाय या पाण्याच्या माध्यमातून कोरोना संसर्गाचा होण्याची देखील भीती व्यक्त करण्यात येत होती. संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. दुपारपर्यंत या बिनधास्त पोहणाऱ्या तरुणांना कोणीही अटकाव केलेला नव्हता. ते सर्वजण बिनधास्त पाण्यात पोहताना दिसून येत होते.