परभणी - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज वैष्णवी मंगल कार्यालयात रक्तदान शिबीर पार पडले. खासदार संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले गेले. या शिबीरात 500 जणांनी रक्तदान केले. परभणीच्या शासकीय रुग्णालयात रक्ताचा पुरवठा कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही खासदार संजय जाधव यांनी यावेळी दिली.
या संकटकाळात महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार शिवसेना व युवासेना यांच्यावतीने खासदार संजय जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर आणि खासदार संजय जाधव यांच्या हस्ते झाले.
परभणीच्या शासकीय रुग्णालयाला कधीही रक्त पुरवठा कमी पडू दिला जाणार नाही. रक्ताची गरज भासेल तेव्हा आम्हाला कळवावे. रक्तदात्यांना त्यांच्याकडे पाठवून रक्त उपलब्ध करून दिले जाईल, असे अशी ग्वाही खासदार जाधव यांनी यावेळी दिली. याप्रसंगी शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खासदार जाधव यांना शुभेच्छा दिल्या.
या शिबिरातून जास्तीत जास्त रक्त जमा करण्याचा आयोजकांनी निर्धार केला होता. परंतु, सद्यस्थितीत रक्त साठ्याची आवश्यकता नसल्याचे शासकीय रुग्णालयातील अधिकार्यांनी सांगितल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तसाठा जमा करण्यात आला नाही. याशिवाय शासकीय रुग्णालयाला गरज भासेल, तेव्हा रक्त उपलब्ध करून देण्यासाठी अनेक रक्तदात्यांनी आपली नाव नोंदणी केल्याची माहिती संयोजकांनी दिली.
शिबिरासाठी शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांसह जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा राठोड, उद्धवराव देशमुख, हुजूर साहेब ब्लड बँक व न्यू लाईफ ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या शिबीरास आमदार डॉ.राहूल पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी यांनीही भेट दिली.