परभणी - परभणी ते जिंतूर या महामार्गचे काम गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळले आहे. अर्धवट तयार झालेल्या या रस्त्यावरील मुरुमाची माती झाली आहे. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसामुळे या मातीचे आता चिखलात रुपांतर झाले आहे. परिणामी या चिखलात मोठी वाहने अडकत आहेत. तर लहान वाहने घसरल्याने अपघात होत आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
औरंगाबाद - नांदेड या राज्य महामार्गांतर्गत जिंतूर ते परभणी या सुमारे पावणेतीनशे करोड रुपयांच्या सिमेंट रस्त्याचे काम 2017 साली सुरू करण्यात आले होते. या कामाला 19 सप्टेंबर 2019 रोजी पूर्ण करण्याचे आदेश आहेत. पण गेल्या एक वर्षापासून हे काम बंद पडलेले आहे. अर्धवट अवस्थेत असलेल्या या रस्त्यावर ठिक-ठिकाणी मुरूम टाकलेला आहे. परंतु या रस्त्यावरुन वाहनांची रहदारी असल्याने या मुरुमाची आता माती झाली आहे. परिणामी त्यावर पडलेल्या थोड्याशा पावसाने देखील या रस्त्यावर चिखल होतो. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागते, मोठी वाहने या रस्त्यावर घसरतात, तर दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. लहान-मोठी वाहने या रस्त्यावर घसरत आहेत. तर आज सकाळी झरी गावाजवळ रस्त्यावरच्या चिखलात एक ट्रॅव्हल्स आणि ट्रक अडकला आहे. यामुळे आता हा रस्ता वाहतुकीसाठी २ ते ३ तास ठप्प झाला होता.
हा प्रकार नित्याचाच झाला असून यामुळे आता या रस्त्यावर दररोज प्रवास करणारे प्रवासी चांगलेच वैतागले आहेत. दरम्यान, विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी या रस्त्याच्या कामात वैयक्तिक लक्ष घालून हे काम एका कंत्राटदाराला दिले होते. मात्र यानंतरही हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.