परभणी - जिल्ह्यात ऐन खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना वेठीस धरून युरिया खतांचा काळाबाजार सुरू आहे. यामुळे शेतकरी बेजार झाले आहेत. युरियाचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा अन्यथा त्या व्यापाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचे सोयाबीन न उगवल्याचे प्रकरण ताजे असतानाच शेतीसाठी आवश्यक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून त्याचा काळा बाजार केला जात असल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आला. सोनपेठ तालुक्यातील एक कृषी सेवा केंद्रचालक आपल्या गोदामातून शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसै घेऊन युरिया खत देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर शेतकऱ्यामधून संताप व्यक्त होत आहे.
दुसरीकडे चार दिवसापूर्वी आलेला संपूर्ण युरिया शेतकऱ्यांना वाटल्याचा दावा, कृषी सेवा केंद्र चालकांनी केला होता. संपूर्ण युरिया चार दिवसापूर्वी वाटलेला असताना दुकानदारांच्या गोदामात हा युरिया आला कुठून? असा सवाल शेतकरी संघटनेचे माजी मराठवाडा विभाग प्रमुख सुधीर बिंदू यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे सोनपेठचे कृषी अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने, कृषी विभाग व जिल्हा परिषदेचा कृषी विभाग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी केंद्रचालक मनमानी करत आहेत. यापूर्वीही बियाण्यांचा मोठा काळाबाजार करण्यात आला होता. जास्तीचे पैसै दिल्यास हवे ते खत व बियाणे उपलब्ध होत होते. आताही तीच परिस्थिती निर्माण होत आहे. यात सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.
शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांविरोधात आंदोलन -
दरम्यान, सोनपेठ तालुक्यात शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. काही दिवसापूर्वी आलेला युरिया जर पूर्णपणे वाटला तर गोदामात खत कुठून आला? याची तपासणी होणे गरजेचे आहे. कोणताही दुकानदार जास्तीचे पैसै घेऊन शेतकऱ्यांना लुटत असेल तर शेतकरी संघटना त्याच्याविरोधात आंदोलन करणार असल्याचे सुधीर बिंदू 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा - मुलाचा शाही विवाह उद्योजकाला पडला महागात; भरावा लागणार 40 कोरोनाबधितांचा खर्च
हेही वाचा - 'ऑनलाईन' शिक्षणासाठी स्मार्ट फोन आणायचा कुठून?, शाळा सोडून विद्यार्थ्यांना जुंपलं शेतात