परभणी - अल्पसंख्याक मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून, ते देशद्रोही आहेत. त्यामुळे त्यांच्या हस्ते झेंडावंदन करू नये, या मागणीसाठी परभणीत भाजप कार्यकर्त्यांनी (BJP Activist) पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत मोर्चा काढला. या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याने काही काळ परभणीत तणाव निर्माण झाला होता.
नवाब मलिकांच्या हस्ते ध्वजारोहण नको !
अल्पसंख्याक मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध तसेच देशाच्या गुन्हेगारांसोबत केलेले व्यवहार पुराव्यानिशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणलेले आहेत. त्यामुळे पालकमंत्री नवाब मलिक यांचे व्यावहारीक संबंध देशद्रोह्या सोबत असल्याकारणाने उद्या, बुधवारी परभणीत प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते करण्यात येऊ नये, याकरिता भाजपच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र ध्वजावंदनाच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक आज मंगळवारी परभणीत दाखल झाले आहेत. त्यामुळे “देशद्रोही पालकमंत्री वापस जा, वापस जा” अशा घोषणाबाजी देत भाजपच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलनकर्त्यांना परभणी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन जवळून अटक करण्यात आली.
या कार्यकर्त्यांना झाली अटक -
यावेळी अटक करण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यांमध्ये महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी, संघटन सरचिटणीस एन.डी.देशमुख, मनपा सदस्य मोकिंद खिल्लारे, माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, सरचिटणीस संजय रिझवानी, मंडळाध्यक्ष भीमराव वायवळ, तालुकाध्यक्ष संदीप जाधव, उपाध्यक्ष विजय गायकवाड, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष रामदास पवार, चिटणीस संतोष जाधव, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष अतीख पटेल, किसान मोर्चा संयोजक अंकुश आवरगंड, अनुसूचित जाती मोर्चा संयोजक उमेश शेळके, वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ.मनोज पोरवाल, कामगार आघाडी संयोजक रोहित जगदाळे, आध्यात्मिक आघाडी संयोजक संजय जोशी, संदीप शिंदे, दिपक शिंदे, माऊली कोपरे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.