परभणी - भाजपच्या ताब्यात असलेल्या परभणी जिल्ह्यातील सेलू आणि पालम नगरपालिकेने सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात ठराव घेत तो पारित केला. देशभरात या कायद्यावरुन वातावरण तापलेले असताना भाजपच्याच ताब्यात असलेल्या नगरपरिषदेने अशा प्रकारचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. त्यातच आता या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दानवे यांनी तत्काळ कारवाई करत सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि पालमचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे यांना निष्कासीत केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा... भाजपच्या ताब्यातील नगरपालिकांनीच संमत केला 'सीएए'-'एनआरसी' विरोधात ठराव
सेलू नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा 28 फेब्रुवारीला पार पडली होती. ज्यात विधानसभेपूर्वी 18 नगरसेवकांसह भाजपमध्ये दाखल झालेले नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी पालिकेच्या सभागृहात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) याला विरोध असल्याचा विषय मांडला होता. सर्व सदस्यांनी यावर चर्चा केली. नगरसेवक अब्दुल वहिद हमीद यांनी अनुमोदन दिले. तर सभागृहातील 28 पैकी 26 नगरसेवकांनी या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या.
शिवसेनेचे नगरसेवक मनीष कदम आणि आशा दिशागत यांनी मात्र पक्षाची भूमिका पक्षश्रेष्ठींना विचारुन आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगून स्वाक्षऱ्या केल्या नाहीत. विशेष म्हणजे हा ठराव घेतल्याची माहिती गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याच प्रमाणे पालम नगरपंचायतीही भाजपचे वर्चस्व असून येथील उपनगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे यांनी देखील हा ठराव घेऊन तो संमत केला. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी काल 3 मार्च रोजी कारवाई करत या दोन्ही लोकप्रतिनिधींना निष्कासित केल्याचे आदेश आदेश बजावले आहेत.
हेही वाचा... एनआरसी, सीएए विरोधात अधिवेशनात ठराव मंजूरीच्या मागणीसाठी उपेक्षित समूहाचे आंदोलन
भाजप आमदार बोर्डीकर यांच्यापुढे अडचणी वाढु शकतात..
नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेलूतील महाजनादेश यात्रेत 18 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर विनोद बोराडे हे भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर आणि त्यांचे वडील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे समर्थक आहेत. सेलू पालिकेच्या या निर्णयाचा परिणाम भाजपमधील त्यांच्या अंतर्गत संबंधांवर होऊ शकतो. त्यादेखील या प्रकरणाने अडचणीत येवू शकतात. तर भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेशराव रोकडे यांचे पालम नगरपंचायतवर वर्चस्व असताना देखील असा ठराव त्याठिकाणी पारित झाल्याने ते सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.
बहुमताने घेतला होता ठराव - बोराडे
सेलू नगरपरिषदेच्या या ठरावाला नगरसेवकांचे बहुमत होते. त्यामुळे पाथरी येथील साईबाबांचे जन्मस्थान मंदिर आणि सेलू येथील त्यांचे गुरू बाबासाहेब यांच्या संदर्भातील ठराव, तसेच सीएए आणि एनआरसी विरोधातील ठराव बहुमताने आम्ही पारित केल्याचे याबाबत बोलताना नगराध्यक्ष विनोद बोराडे म्हणाले. तर पालममध्ये सुद्धा मुस्लिम नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने त्यांच्याकडून हा ठराव मांडण्यात आला होता. त्यामुळे सीएए आणि एनआरसी विरोधातील ठराव मंजूर झाला असल्याचे सांगितले.