परभणी - बोर्डीकर-भांबळे असा कायम वाद असलेल्या जिंतूर तालुक्यात यंदाची ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याचे दिसून आले. मात्र, जिंतूर तालुक्यात १०१ ग्रामपंचायतींपैकी ७५ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकल्याचा दावा आमदार मेघना बोर्डीकर यांनी केला आहे. असे असले तरी जिंतूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बोरीत मात्र भाजपला मोठी हार पत्करावी लागली. या ठिकाणी भांबळे गटाचे १७ पैकी १४ उमेदवार निवडून आले आहेत.
हेही वाचा - परभणीतील 498 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात, कार्यकर्त्यांची केंद्राबाहेर गर्दी
१०१ पैकी ७५ ठिकाणी विजय
परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक अतिशय चुरशीच्या झाल्या. बोर्डीकर आणि भांबळे गटातील या लढतीत बोर्डीकर गटाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. जिंतूर तालुक्यातील १०१ पैकी ७५ ग्रामपंचायती बोर्डीकर गटाने खेचून घेतल्याचा दावा करत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व आमदार मेघना बोर्डीकर यांनी मतदारांचे आभार मानले.
८०९ पैकी ५२४ सदस्य भाजपचे
जिंतूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. त्याचा निकाल आज हाती आला असून त्यापैकी ७५ ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकवल्याची माहिती आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली. या निवडणुकीत ८०९ पैकी ५२४ सदस्य भाजपचे निवडून आल्याचे देखील त्या म्हणाल्या.
बोरीत मात्र भाजपचा पराभव
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींपैकी सर्वात मोठ्या असलेल्या बोरी या ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या नेतृत्वात लढवली आहे, तर विरोधी पक्षातील भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी डॉ. विद्या चौधरी यांच्या नेतृत्वात या ग्रामपंचायतीमध्ये संपूर्ण ताकद पणाला लावली होती. परंतु, बोरीच्या ग्रामस्थांनी विद्यमान सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजय चौधरी यांना पसंती देऊन १७ पैकी तब्बल १४ उमेदवार निवडून दिले आहेत. एकीकडे संपूर्ण तालुक्यात दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपला मात्र तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या बोरीत आपला चमत्कार दाखवता आला नाही.
जिंतूर विधानसभा मतदार संघात बोर्डीकर-भांबळे गटाचे राजकारण नेहमीच चर्चेचा विषय असते. ही ग्रामपंचायत निवडणूकही याला अपवाद नव्हती. बहुतेक गावांमध्ये भाजपच्या बोर्डीकर आणि राष्ट्रवादीचे भांबळे गटात अटीतटीचे सामने रंगले.
हेही वाचा - परभणी जिल्ह्यातील भाजपनेते अभय चाटे यांचे निधन