परभणी - शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीकविम्याची रक्कम रिलायन्स कंपनी आणि राज्य सरकारने पेरणीपुर्व वितरीत करावी, या मागणीसाठी मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हा शाखेतर्फे परभणीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कपडे काढून आत्मक्लेश आंदोलन केले. तसेच राज्य सरकार आणि विमा कंपन्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
भाजपाच्या आमदार मेघना बोर्डीकर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्या नेतृत्वात कृषी अधीक्षकांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पीकविम्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
घोषणाबाजीने परिसर दणाणला -
कृषी अधीक्षकांच्या कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात संतप्त कार्यकर्त्यांनी काळे झेंडे आणि निषेधाचे फलक झळकवले होते. 'हक्काचा पीकविमा दाबून ठेवणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा धिक्कार असो, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, पीक विम्याची रक्कम पेरणीपूर्वी मिळालीच पाहिजे' यासह अन्य घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर अक्षरक्षः दणाणून सोडला.
अंगावरील शर्ट काढून अधिकाऱ्यांकडे सुपुर्द -
या प्रसंगी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अंगावरील शर्ट काढून संबंधीत कंपनीच्या प्रतिनिधी व कृषी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना सुपुर्द केले. या अनोख्या आंदोलनाने अधिकारी देखील गांगरून गेले. ते समाधानकारक उत्तरे देवू शकले नाहीत. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी अधिक तीव्र घोषणाबाजी परत राज्य सरकारसह विमा कंपन्या आणि अधिकाऱ्यांचा देखील निषेध नोंदवला.
'रिलायन्स'ने शासनाशी संगणमत करून पिकविमा दाबून ठेवला - कदम
रिलायन्स कंपनीने जिल्ह्यातील सोयाबीनच्या दहा आणि ज्वारीच्या केवळ पाच मंडळातील शेतकऱ्यांना विम्याची तुटपुंजी रक्कम मंजूर केली. ही रक्कम फेब्रुवारीच्या तर तुरीची रक्कम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात वाटप करणे आवश्यक होते. मात्र आता पेरणीची वेळ आली, तरी कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नाही. रिलायन्स कंपनीने जाणीवपूर्वक महाराष्ट्र शासनाशी संगणमत करून हा पिकविमा दाबून ठेवल्याचा आरोप यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांनी केला.
आंदोलनात यांचा सहभाग -
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ. कदम, बाळासाहेब जाधव, शिवाजी मव्हाळे, समीर दुधगावकर, बाळासाहेब भालेराव, सुरेश भुमरे, अप्पासाहेब कदम, बाळासाहेब शिंदे, राजेश बालटकर, नवनाथ सावंत, तुकाराम मुंडे, अशोक मुंडे, विष्णु शिंदे, त्र्यंबक मुंडे, माऊली कदम, शामसुंदर जाधव, नामदेव जाधव आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच काही शेतकरी देखील सहभागी झाले होते.
हेही वाचा - उठसूट केंद्रावर टीका करण्यापेक्षा समन्वय साधला तर राज्याचा विकास होईल - फडणवीस