परभणी - शहरातील विद्यानगर परिसरात ऑटोचालक वडिलांना पैसे देण्यासाठी आलेल्या सायकलस्वार मुलीचा कचऱ्याच्या टेम्पोला अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवार) दुपारी एकच्या सुमारास घडली. चालक टेम्पो सोडून पळाल्याने त्या ठिकाणच्या सतप्त नागरिकांनी टेम्पोवर जोरदार दगडफेक केली.
श्रुती भराडे असे या १२ वर्षीय मुलीचे नाव आहे. तिचे वडील नागोराव भराडे हे ऑटोचालक असून आज विद्यानगर कॉर्नर पॉईंटवर उभे होते. त्यांना पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी घरी फोन करून पैसे मागून घेतले. हेच पैसे देण्यासाठी श्रुती वांगी रोड येथून विद्यानगरकडे आली होती. मात्र, वडलांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच विद्यानगरच्या कापूस संशोधन केंद्रसमोर महानगरपालिकेचा कचरा उचलणाऱ्या टेम्पोने तिला धडक दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी टेम्पोवर जोरदार दगडफेक करण्यास सुरुवात केली. ही माहिती मिळताच नानलपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांना आवरले. त्या मुलीला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. या मुलीच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण आहे.
शहरात पाईपलाईनसाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे हा अपघात झाला, असेही सांगण्यात येत आहे. विद्या नगर परिसरात पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. ज्यामुळे रस्त्यावर मातीचे ढिगार साचले असून यावरून वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. त्याचाच परिणाम सदर अपघात झाल्याचे सांगण्यात येते आहे.