परभणी- नदी पात्राच्या काठावर विश्रांतीसाठी थांबलेल्या भिक्षूंच्या समूहातील एका तरुणाचा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने बुडून काल मृत्यू झाला होता. गेल्या बारा तासांच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह सापडला आहे. सखाराम तुळशीराम गिरी (वय 25) असे मृताचे नाव आहे.
जिंतूर तालुक्यातील बोरीजवळ असलेल्या तेली जवळा या गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी काही भिक्षूंचा समूह आला आहे. ते गावाजवळ असलेल्या नदीच्या पात्राजवळ विश्रांतीसाठी थांबले होते. दरम्यान, या भिक्षूंच्या समूहातील सखाराम तुळशीराम गिरी (वय 25 वर्षे रा. वगरवाडी पोस्ट औंढा, जिल्हा.हिंगोली) हा तरुण पाय धुण्यासाठी नदीपात्रात गेला होता. मात्र हात पाय धुवत असतांना दुर्दैवाने नदीपात्रात पाय घसरून पडल्याने तो पाण्यात बुडाला. या नंतर १० ते १२ तासांपासून फौजदार व्यंकटेश आलेवार, त्यांची टिम आणि बोरीचे सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ या युवकाची शोधाशोध करीत होते. त्याचा मृतदेह सापडला असून बोरी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याचे प्रेत नातेवाईकांना देण्यात आले आहे. या प्रकरणी बोरी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत पावलेल्या भिक्षूस पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.