परभणी - पावसाळा संपत आला तरी परभणी जिल्ह्यात वरूण राजाने म्हणावी तशी कृपादृष्टी दाखवली नाही. त्यामुळे आता परतीचा का होईना, परंतु तो पाऊस पाडण्यासाठी प्रशासनाकडून प्राथमिकच प्रयत्न केला जात आहे. शनिवारी परभणी आणि गंगाखेड तालुक्यावरून कृत्रिम पाऊस पडणारे विमान फिरल्याने काही ठिकाणी दहा ते पंधरा मिनिटे रिमझिम पाऊस पडल्याची माहिती नागरिकांनी दिली. मात्र,सायंकाळनंतर दिवसभर दाटून आलेले ढग देखील गायब झाल्याचे चित्र होते.
हेही वाचा - परभणीत पावसाची जोरदार हजेरी; शेतकऱ्यांना दिलासा
परभणी जिल्ह्याची वार्षिक पावसाची सरासरी 774.62 मिलिमीटर एवढी आहे; मात्र, साडेतीन महिन्यांच्या कालावधीत परभणी जिल्ह्यात केवळ 449 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद वार्षिक सरासरीच्या केवळ 58 टक्के आहे. विशेष म्हणजे 1 जून पासून 14 सप्टेंबरपर्यंत 625 मिलिमीटर पावसाची अपेक्षा होती; परंतु तसे झालेले नाही. प्रत्यक्षात परभणी जिल्ह्यात 449 (71टक्के) मिलिमीटर पाऊस पडल्याने अवर्षणाची परिस्थिती कायम आहे. दरम्यान, जायकवाडी धारणाचे पाणी गोदावरी पात्रात आल्याने नदीच्या लाभक्षेत्रातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र, परभणी जिल्ह्यातील इतर 20 ते 22 लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये अजूनही 10 ते 15 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील पाणी परिस्थिती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परभणी जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला. अहमदनगर जिल्ह्यातून आलेले विमान बीड जिल्हा ओलांडून परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी, दामपुरी, खोकलेवाडी, चिंचटाकळी आदी गावांवरून गेल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दुपारी 01:39 ते सायंकाळी 5.30 च्या दरम्यान या विमानाने ढग दाटून आलेल्या भागात पाऊस पाडल्याचा दावा परभणीच्या जिल्हा प्रशासनाने केला आहे. या संदर्भात परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी माहिती दिली.
हेही वाचा - पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस; भामा-आसखेडसह चासकमान धरणातून विसर्ग सुरू
प्रत्यक्षात गावातील नागरिकांना या संदर्भात विचारले असता, 'सकाळपासून गावावर प्रचंड ढग दाटून आले होते, त्यानंतर गंगाखेडच्या डोंगर पट्ट्यात विमान फिरले असून सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान दहा ते पंधरा मिनिटे रिमझिम पाऊस पडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. परभणी तालुक्यातील साळापुरी, पोखर्णी, कवडगाव आणि सिंगणापूर या भागात देखील या विमानाने घिरट्या घातल्या. परभणी शहरातील जिंतूर रोड भागात देखील काही लोकांना हे विमान दिसून आले. दरम्यान, पोखर्णी, कवडगाव, साळापुरी या भागात देखील सायंकाळी 5 च्या सुमारास पाऊस पडल्याची माहिती नागरिकांनी दिली. मात्र, असे असले तरी, सकाळपासून परभणी जिल्ह्यावर ढग दाटून आले होते. परंतु सायंकाळनंतर हे दाटून आलेले ढग देखील गायब झाल्याची माहिती लोक देत आहेत. परभणी शहरात देखील हीच परिस्थिती होती.